कोल्हापूर / प्रतिनिधी

मौजे सांगाव ता. कागल येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि पिंपळगाव खुर्द ता. कागल येथील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय यांच्या प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहेत. या दोन्ही महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमता प्रत्येकी १०० असून पूर्ण प्रवेश क्षमतेने हे अभ्यासक्रम सुरू राहणार आहेत. दरम्यान; उत्तूर ता. आजरा येथील शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालयातील तिसऱ्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार आहे.
कोल्हापुरात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत या तिन्ही शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांची आढावा बैठक झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून उत्तूर ता. आजरा येथे देशातील पहिले शासकीय निसर्गोपचार व योगा महाविद्यालय व रुग्णालय मंजूर झाले आहे. या महाविद्यालयाचे वर्ग बहिरेवाडी येथील जे. पी. नाईक स्मारकाच्या इमारतीत भरत आहेत. महाविद्यालय व रूग्णालयाचे काम उत्तुर – धामणे रस्त्यावरील १७ एकरांच्या विस्तीर्ण जागेत प्रगतीपथावर आहे.
ऊतुर येथील शासकीय निसर्गोपचार व योग महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डाॅ. सौ. भाग्यश्री खोत यांनी दिलेली माहिती अशी, सुरुवातीची दोन वर्ष निसर्गोपचार व योगा महाविद्यालयातील पदे प्रतिनियुक्तीवर भरली होती. परंतु; या महाविद्यालयाने स्वतःचा कर्मचारी वर्ग भरला आहे. यामध्ये शारीर रचनाशास्त्र- ॲनाटाॅमी, शारीर क्रियाशास्त्र -फिजिऑलॉजी अँड बायोकेमिस्ट्री, योगा आणि नॅचरोपॅथी या तीन विषयांसाठी प्रत्येकी एक सहाय्यक प्राध्यापक आणि एक सहयोगी प्राध्यापक असा सहा स्टाफ भरला आहे. तसेच; निसर्गोपचार व योगा रुग्णालयासाठी एक निवासी वैद्यकीय अधिकारी आणि चार वैद्यकीय अधिकारी ही पाच पदेही भरली आहेत. तसेच; संस्कृत विषयाच्या शिकवणुकीसाठी मानसेवी तत्त्वावरील अध्यापकांचीही नियुक्ती केली आहे. तसेच; या रुग्णालयासाठी सात मानसेवी तत्त्वावरील पदभरती केली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांमध्ये नीटच्या निकष पात्रतेनुसार तिसऱ्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होणार आहे.
पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे यांनी दिलेली माहिती अशी, २२ अध्यापकांची भरती करण्यात आली. शारीररचना शास्त्र- ॲनाटाॅमी, शारीर क्रियाशास्त्र- फिजिऑलॉजी अँड बायोकेमिस्ट्री, औषध निर्माणशास्त्र- फार्मसी, रेपर्टरी, ऑरगॅनन ऑफ मेडिसिन, मटेरिया मेडिका या सहा विषयांसाठी एकूण २२ अध्यापकांची भरती झाली. यामध्ये सहाय्यक प्राध्यापक ११, सहयोगी प्राध्यापक पाच व प्राध्यापक सहा अशा २२ पदांची भरती पूर्ण झाली आहे. दरम्यान; शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयाने कागल नगरपालिकेच्या मालकीची महात्मा ज्योतिबा फुले मार्केटची ईमारत भाड्याने घेतलेली आहे. या इमारतीत लवकरच संपूर्ण सेवासुविधांसह अत्याधुनिक होमिओपॅथिक रुग्णालय व आयुर्वेदामध्ये पंचकर्म रुग्णालय सुरू होणार आहे.
……….



