
(कापशी/ प्रतिनिधी)
सदगुरू बाळूमामा मूळ देवस्थान मेतके (ता कागल ) येथील चिकोत्रा नदीवरील पुलासह हमीदवाडा -मेतके – कुडीटेक (जैन्याळ) रस्त्याचे काम केंद्र शासनाच्या सी,आर,एफ. आराखड्यामध्ये तात्काळ समाविष्ट करून निधी मंजूर करून प्रस्तावित काम पूर्ण करावे, अन्यथा याबाबत सरपंच परिषद , विविध पक्ष , संघटना पदाधिकारी कृती समीतीमार्फत मेतके बंधारा येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनास निवेदनाद्वारे विविध संघटनांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,मेतके येथे सद्गुरु बाळूमामा मूळ देवस्थान या ठिकाणी आमावस्या ,पौर्णिमा, रविवार तसेच उत्सवाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात सह शेजारील कर्नाटक,गोवा,आंध्र प्रदेश,मध्यप्रदेश मधील लाखो भाविकांची गर्दी आहे. सध्या या ठिकाणची वाहतूक कोल्हापूर पद्धतीचे बंधारे वरूनच होत आहे. ते बंधारे अरुंद असल्यामुळे पुलावरून पडून बरेच अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मेतके नदीवर पूल बांधकाम सह हमीदवाडा -मेतके – कुडीटेक (जैन्याळ) रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे.
यावेळी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक व कृती समितीचे निमंत्रक ॲड. दयानंद पाटील नंद्याळकर म्हणाले की, गेली अनेक वर्ष परिसरातील विविध संघटना ,पक्ष व कार्यकर्ते यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे याबाबत चर्चा, निवेदन, आंदोलने करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र झोपेचे सोंग घेतलेले या प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे . नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाने त्वरित निधी उपलब्ध करून या प्रश्न मार्गी लावावा अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही.
यावेळी तालुका अध्यक्ष कृष्णात बुरटे (हमीदवाडा) आर एन पाटील (मेतके) वसंत शिंदे (गलगले) युवराज कदम (खडकेवाडा) , महादेव कामते , हिंदुराव अस्वले, उत्तम बांमरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना (उ.बा.ठा.), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्ष्यांचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.



