(विशेष वृत / समाधान म्हातुगडे )

राजकीय विद्यापीठ समजल्या जाणा-या   कागल तालुक्यात नव्या सत्तासमीकरणांची चर्चा तापली आहे.  “शत्रुत्व” असलेले मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे हे एकत्र आले असून यांच्यात आता “ मित्रत्व” झाले आहे. मुश्रीफ – घाटगे समझोता एक्स्प्रेसमुळे २४ तासात राजकीय समीकरणे बदलली आहेत. वर्षभरापूर्वी एकमेकांविरोधात लढणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यामध्ये फक्त तात्पुरता युद्धविरामच नाही, तर युती सुद्धा झाली आहे. या घडामोडींमागे वरिष्ठ पातळीवरील राजकीय डावपेच असल्याचे समोर येत आहेत.

                मुश्रीफ विरुद्ध घाटगे संघर्ष गेली अनेक दशके महाराष्ट्राने पाहिला आहे. या दोघांची लढाई अक्षरशः वैयक्तिक पातळीवर पोहोचली होती.  गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ (अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून) आणि समरजित घाटगे  (शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून) एकमेकांविरोधात लढले होते. हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीत विजयाची डबल हॅट्रिक केली. घाटगे यांचा विजय निश्चित मानला जात असताना महायुतीमध्ये राष्ट्रवादीची (अजित पवार गट) एन्ट्री झाल्यामुळे घाटगे यांनी भाजपला रामराम केला होता. 

कागलला राजकारणाचे विद्यापीठ का म्हटले जाते?

  • कागलचे नाव घेतले असता आधी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह घाटगे संघर्ष डोळ्यासमोर उभा राहतो.
  • मंत्री हसन मुश्रीफ हे एकेकाळी कै. विक्रमसिंह घाटगे  यांचे कट्टर कार्यकर्ते होते. 
  • शाहू कारखान्याच्या स्थापनेच्या वेळी हसन मुश्रीफ यांनी घाटगेंना सोडले आणि त्यांचे कट्टर विरोधक दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्या गटात दाखल झाले.
  • सदाशिवराव मंडलिक यांनी मुश्रीफ यांना अल्पसंख्यांक समाजातील युवा कार्यकर्ता म्हणून बळ दिले.
  • चार टर्म आमदार राहिलेले सदाशिवराव मंडलिक खासदार होऊन दिल्लीत गेले, आणि तेव्हा मुश्रीफ यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला.
  • मुश्रीफ यांनी विक्रमसिंह घाटगे यांची साथ सोडल्यापासून हा संघर्ष जवळपास 2004 पर्यंत (जेव्हा विक्रमसिंह घाटगे यांनी शेवटची लोकसभेची निवडणूक लढवली) होता.
  • अल्पसंख्यांक समाजातील एक नेता कागलसारख्या ठिकाणाहून सलग सहा वेळा विधानसभेत जाणे ही कागलमधील निश्चितच सोपी गोष्ट नाही.

यापूर्वी सुद्धा राजकीय दोस्ताना 

  • राजकारणातील संघर्ष आणि समझोता कागलमध्ये पहिल्यांदा घडलेला नाही
  • जवळपास 23 वर्षांपूर्वी, दिवंगत सदाशिवराव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांच्यामध्ये मोठे राजकीय शत्रुत्व होते.
  • तरीही एका शाळेच्या इमारतीच्या उद्घाटनाला सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे, संजयबाबा घाटगे आणि हसन मुश्रीफ हे सर्व नेते एकाच व्यासपीठावर आले होते.
  • पत्रकार अतुल जोशी यांनी या चारही नेत्यांना एकत्र आणले होते.
  • या एकत्रीकरणाची उत्सुकता इतकी होती की तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी अतुल जोशी यांना मुंबईला बोलावून घेतले आणि ‘तुम्ही मंडलिकांना व घाटगेंना एकत्र आणलंच कसं’ अशी १५ मिनिटे चर्चा केली आणि हे कृत्य कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला कारणीभूत ठरेल असे सांगितले होते.
  • दरम्यान, कट्टर वैरी हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे एकत्र आले असले तरी, कागलमधील संजय मंडलिक गटाला बेदखल करून चालणार नाही.
  • संजय मंडलिक यांच्या पाठीमागे सदाशिवराव मंडलिक यांचे नाव आहे, ज्यांनी बारामतीच्या विरोधात बंड करून अपक्ष खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती.
  • मागील अनेक वर्षे सर्वसामान्य जनतेच्या कामात अहोरात्र राबणारे मंत्रि हसन मुश्रीफ यानी अल्पसंख्याक असतान देखील आपल्या कार्य कतृत्वाच्या बळाबर जनसामान्यांच्या हदयसिंहासनावर आपले स्थान निर्माण केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यानी आपला ठसा उमटवला आहे हे निश्चित. त्यामुळे त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात मोठी ताकद आहे .  कागलच्या राजकारणातील चारही बड्या नेत्यांचे प्रत्येकाचे  साखर कारखाने आहेत. तसेच सहकारी संस्थाच्या माध्यमातून जाळे निर्माण  करत प्रत्येकाने आपले गावागावात  गट आहेत. प्रत्येक निवडणूकीत टोकाची ईर्षा असते . अनेक वेळा  गावपातळीवर गटागटात मोठा  राजकीय संघर्ष  झाला आहे. अनेकवेळा झालेल्या अनअपेक्षीत राजकीय  घडामोडीमुळे  काहीवेळा कार्यकर्त्यांच्या मधील शत्रुत्व मिटून मित्रत्व झाल्याचा इतिहास आहे .
  • कागलच्या राजकीय इतिहासामध्ये अशा आघाड्या अनेकवेळा झाल्या आहेत. समरजित घाटगे यांनी जाहीर केले की गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपला आहे आणि त्यांनी जुने वैर ‘गंगेला अर्पण करून’ नव्याने एकत्र येऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *