
(कागल/ प्रतिनिधी )
मुख्यमंत्र्यांचा आमच्या आघाडीला आशीर्वाद आहे. त्यामुळे कागल शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणू , असा विश्वास शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी व शाहू आघाडीच्या पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील श्रीमंत जयसिंगराव महाराज चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राजे समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले, आम्ही याआधीच स्पष्ट केले आहे की, कागल नगरपालिकेसाठी मुख्यमंत्र्यांच्यामुळे आम्ही एकत्र येऊन आघाडीने निवडणूकीस सामोरे जात आहोत. एकमेकांच्या विरोधातील संघर्षातील ताकद कागलच्या विकासासाठी वापरली तर जिल्ह्याला एक चांगली दिशा देऊ. मंत्री हसन मुश्रीफसाहेब व माझ्या माध्यमातून याआधी शहराच्या विकासासाठी आम्ही निधी आणला आहे. परंतु; आता मुख्यमंत्र्यांचाच आशीर्वाद आमच्या आघाडीच्या पाठीशी असल्यामुळे यापेक्षा मोठ्या प्रमाणात निधी कागलच्या विकासासाठी खेचून आणू. छत्रपती शाहू महाराजांचे कागल देशात आदर्श बनवण्यासाठी आमच्या आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आशीर्वाद, माझा मंत्रिमंडळातील अनुभव व आता समरजितसिंह घाटगे यांची मिळालेली साथ यामुळे कागलमध्ये विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी तर येईलच. परंतु; शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जातील.त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते जोमाने काम करतील. कागलला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आमच्या आघाडीचे सर्व उमेदवारांना विजयी करा.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. सविता माने म्हणाल्या, मंत्री हसन मुश्रीफ व राजे समरजितसिंह घाटगे या दोन्हीं नेत्यांच्या माध्यमातून कागलचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. तरीही आणखी काही कामे अपुर्ण आहेत. शिवाय नागरिकांच्या अपेक्षा वाढत आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला संधी द्या.उमेदवार पुनम मोरे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
म्हणून जनतेतून युतीचे उत्सफुर्त स्वागत……!
उमेदवार दीपक मगर म्हणाले, गेली दहा वर्षे मंत्री मुश्रीफ व राजेसाहेबांचे समर्थकांमध्ये संघर्ष झाला.परंतु हे दोन प्रमुख नेते एकत्र आल्यामुळे हा संघर्ष थांबल्याने कागलच्या विकासाला गती मिळणार आहे.त्यामुळे संघर्षाऐवजी सामंजस्यातून कागलच्या विकासासाठी झालेल्या या युतीचे कार्यकर्त्यांसह जनतेतून उत्सफुर्त स्वागत होत आहे.कागलच्या सर्वांगिण विकासासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी आम्हाला निवडून द्या



