मुरगुड / प्रतिनिधी

संघर्ष आणि कटूता कमी करून सलोखा व कल्याणकारी विकास वाढावा, या भावनेतून आम्ही युती केली आहे. अजूनही या विकासयात्रेत सामील व्हा, असे जाहीर आवाहन त्यांना यापूर्वीच केलेले आहे. येणारच नसाल तर संघर्ष अटळ आहे, असा इशाराही श्री. मुश्रीफ यांनी दिला.
मुरगुडमध्ये गावभागात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राजर्षी शाहू आघाडी यांची प्रचार सभा संपन्न झाली.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, समरजीतसिंह घाटगे, संजयबाबा घाटगे यांच्याबरोबर आमची आघाडी झाली. राजे आणि बाबा आलेत त्यांनीही यावे असे आवाहन पूर्वीच केले आहे. त्यांनी विरोध केला तर संघर्ष हा होणारच. आमच्या एकत्र येण्यामुळे कागलचे भवितव्य फार मोठे उज्वल होणार आहे. कागलला वजा करून कोणालाही राजकारण करता येणार नाही. असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याने मुरगुड येथील सभेत केले
आमच्या एकत्र येण्यामुळे कागलचे भवितव्य फार मोठे उज्वल होणार आहे. कागलला वजा करून कोणालाही राजकारण करता येणार नाही.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागलच्या धर्तीवर मुरगुड येथील दहा हजार व पन्नास हजार रुपयांमध्ये बेघरांच्या घरकुलाचा प्रश्न, 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी अद्यावत पाणीपुरवठा योजना भविष्यातील पिढ्यांच्या अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न सोडवून पुढील पिढ्यांचा जीवन सुलभ करणे करण्यासाठी 200 कोटी रुपयाच्या निधीची योजना हाती घ्यावी लागेल. प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासकीय आणि मंत्रिमंडळ पातळीवर विषयाची सोडवणूक करण्यासाठी आमच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. शहरातील स्वच्छता, शिवसृष्टी पर्यटन विकास, अद्यावत शाळा, नाट्यगृह आणि क्रीडांगण असा सर्वंकष विकास करण्याची धमक आणि ताकद केवळ आमच्या आघाडीतच आहे, असेही ते म्हणाले.
आम्ही हमाल! नुसत्या टाळ्यांचेच मानकरी
मुरगुडात राष्ट्रवादीला कधीही एकहाती सत्ता दिली नाही. कधी या घराण्याकडे तर कधी त्या घराण्याकडे सत्ता. तरीही शहरासाठी गेल्या वीस वर्षात प्रचंड निधी दिला. केवळ निधी दिला आणि टाळ्या वाजवल्या. पण विकास कार्यावर आमचे नियंत्रण राहिले नाही. त्रुटी राहिल्या. नियोजनानुसार सर्वांगीण आणि शिस्तबद्ध विकासासाठी मुरगुड आमच्या आघाडीकडे द्या, असे आवाहन त्यांनी केले.
हंटर आणि पारदर्शकता!!
आमच्याकडे सत्ता द्या. प्रत्येक विकास कामावर आमची बारीक नजर राहील. पारदर्शकतेचा आग्रह धरू. हंटर घेऊन डोळ्यात तेल घालून योग्य काम करून घेऊ.
शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजीतसिंहराजे घाटगे म्हणाले,” केवळ निवेदन देण्यासाठी सहली काढल्या की कामे होत नाहीत. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. आमच्याकडे विकासाचा अजेंडा आहे. आमच्याकडे काम करून घेण्याची धमक आहे. प्रशासकीय पातळीवर पाठबळ देण्याची जबाबदारी आमची. तळमळ असणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याची जबाबदारी तुमची. आमची युती कोणाच्या विरोधात कोणाला एकटे पाडण्यासाठी नाही. अशा युती आघाड्या कागलला नवीन नाहीत. संजयदादा आणि श्री. मुश्रीफसाहेब यांची युती झाली की ती युती आणि आम्ही मुश्रीफसाहेबांशी आघाडी केली कि ती अभद्र युती, असे म्हणून कसे चालेल? असा सवाल श्री घाटगे यांनी केला.
गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील म्हणाले, ” मुरगूडला पेन्शनरांचे गाव असे लागलेले लेबल काढण्यासाठी शहराचा सर्वांगीण विकास आवश्यक आहे. मुरगूडला कागलचे रूप देण्यासाठी विकास कार्याचा अनुभव असणाऱ्या नेत्यांच्या हाती सत्ता द्या.”
मी शिवभक्त…….!
माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, आज तुम्ही योग्य उमेदवाराला मत देण्यास चुकला तर पुढील पाच वर्ष सत्ता चुकीच्या लोकांच्या हाती जाईल. शहराचा विकास दहा वर्ष मागे येईल. पुढील पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. माझे आजोबा बाळूदादांनी जगदंबा तरुण मंडळ तालीम मंडळ काढून शिवरायांचे विचार या मातीत रुजवले. मी शिवरायांचा सरदार आणि आमचे उमेदवार मावळे शिवरायांच्या विचाराने सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या नेत्यांना सत्तेत संधी द्या.
आप्पाजी मेटकर यांचे मनोगत झाले. स्वागत रणजीत सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक संतोष वंडकर यांनी केले.
बाळ घोरपडे,गोकुळचे अध्यक्ष नविद मुश्रीफ,सुनील मगदूम,अनंत फर्नांडिस, दत्तामामा खराडे, प्रा. चंद्रकांत जाधव,मनोज फराकटे, सुखदेव येरुडकर,विश्वजीत पाटील, राजाराम गोधडे, अमर चौगले, दगडू शेणवी राजू आमते, नामदेव भांदीगरे उपस्थित होते.
मुरगुड: येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या प्रचार सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व शाहू सहकार समूहाचे अध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे. समोर उपस्थित नागरिक.
========



