कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) लढत निश्चित झाल्यानंतर प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा थेट मुकाबला होत आहे. महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा दणक्यात प्रचार केला जात असतानाच महायुतीच्या संजय मंडलिक यांचा प्रचारही जोरदारपणे केला जात आहे.
कागलमध्ये घाटगे-मुश्रीफ-मंडलिक असे मातब्बर गट समजले जातात. कोल्हापूर जिल्ह्यात कागलमध्ये सर्वाधिक गटातटाचे राजकारण केले जाते. या पार्श्वभूमीवर बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले की, महायुतीमधील तीन गट एकत्र आल्यास संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, कागल तालुक्यामध्ये तीन गट एकत्र आले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट एकत्र आला आहे. त्यामुळे तिन्ही गटातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की जर आपण एकत्रित येऊन मताधिक्य मिळवलं तर या निवडणुकीत साक्षात परमेश्वर आला तरी पराभव मंडलिक यांचा पराभव होणार नाही.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी हेलिकॉप्टरने मतदारांना आणायला लागले तरी चालेल, पण मागे पडायचं नाही असं सुद्धा वक्तव्य केलं. ते म्हणाले की तिन्ही गटाचे कार्यकर्ते नेते समजदार आहेत. त्यामुळे कोणी बोलण्यातून, कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्यांचा परिणाम म्हटलिक यांच्या मताधिक्यावरील याचे भान सर्वांनी बाळगले पाहिजे. बोलण्यातून कृतीतून काही चुकीच्या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत जाता कामा नाहीत असेही मुश्रीफ यांनी सांगितले.