
(कूर / सुभाष पाटील )
वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत जागतिक व राष्ट्रीय घडामोडी पोहोचाव्यात आणि ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक गल्लीत पसरावा, या उदात्त हेतूने टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथे एक आदर्शवत उपक्रम साकार झाला आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून व १४ दानशूर ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात पाच मोफत वर्तमानपत्र वाचनालये सुरू करण्यात आली असून या उपक्रमामुळे टिक्केवाडीमध्ये वाचन चळवळीला नवी गती मिळाली आहे.या स्तुत्य उपक्रमाबद्दल संकल्पक बाजीराव पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी दै.तरुण भारतचे पत्रकार सुभाष पाटील यांनी ‘वर्तमानपत्रांचे महत्व व ते का वाचावे’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
पूर्व भुदरगडच्या शेवटच्या टोकाला, डोंगर उतारावर वसलेले टिक्केवाडी हे सुमारे तीन ते साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव. भौतिक विकास झाला असला तरी भौगोलिक रचनेमुळे आजवर येथे नियमितपणे वर्तमानपत्र पोहोचणे कठीण होते. मुख्य बाजारपेठ कूरपासून चार किलोमीटर अंतर, अरुंद गल्ल्या व उतारावरील वस्ती यामुळे वृत्तपत्र विक्रेते येथे येण्यास असमर्थ ठरत होते. परिणामी गावातील अनेक नागरिकांना दररोज वर्तमानपत्र वाचण्याची संधी मिळत नव्हती. ही खंत बाजीराव पाटील यांच्या मनाला सतत बोचत होती. त्यातूनच त्यांनी गल्लोगल्ली फिरून ग्रामस्थांशी संवाद साधला, वाचनाचे महत्त्व पटवून दिले आणि आर्थिक अडचणी लक्षात घेता प्रत्येक गल्लीत मोफत वर्तमानपत्र वाचनालय सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. स्वतःच्या खर्चातून त्यांनी वाचन टेबलांची व्यवस्था केली, प्रत्येक गल्लीत जबाबदार व्यक्ती निवडली आणि देणगीदार शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले. मान-अपमानाची पर्वा न करता त्यांनी अखेर १४ दानशूर ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. या सहकार्यातून प्राथमिक शाळा, दत्त मंदिर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, डौर गल्ली व कुंभार गल्ली येथे वाचनालये सुरू झाली. याचा लाभ केवळ ग्रामस्थांनाच नव्हे तर प्राथमिक शाळा व टिक्केवाडी हायस्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनाही होणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामुळे गावात २५ घरांमध्ये वैयक्तिक वर्तमानपत्रे सुरू झाली असून ही संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. टिक्केवाडीमध्ये प्रथमच घरोघरी वर्तमानपत्र पोहोचू लागल्याने गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ लोकनियुक्त सरपंच राजेंद्र पाटील, उपसरपंच बाळासाहेब मिटके व संकल्पक बाजीराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्रा.पं.सदस्य आप्पासो देसाई, शिवाजी रामाणे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष कांबळे,उपाध्यक्ष सौ.अर्चना पाटील, रविंद्र गुरव,तानाजी गायकवाड, रविंद्र पाटील, मुख्याध्यापक ए.जी देसाई यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक महेश लाड, प्रास्ताविक एस.एम.पाटील यांनी तर आभार संजय कांबळे यांनी मानले.
वर्तमानपत्रांचे अजीव देणगीदार ग्रामस्थ-
संजय बा.पाटील, संभाजी बा. ढेकळे,अमर देसाई (मुख्याध्यापक),डॉ. के.आर.पाटील, संकल्पक बाजीराव आ. पाटील, संतोष पां डौर,दिलीप धों.डौर,भरत मा. गुरव,शामराव द. रामाणे,शिवाजी स. रामाणे,पांडुरंग शा.गुरव,दिनकर पां.कुऱ्हाडे, आनंदा ई.आसबे,निवृत्ती ना. गुरव,रवींद्र पाटील आदी.



