विशेष वृत्त / समाधान म्हातुगडे

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखेमध्ये (Zilla Parishad Election Date ) राज्य निवडणूक आयोगाने बदल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कधी होणार निवडणूक?

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या तारखेत बदल झाल्यामुळे साहजिकच मतमोजणीच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांचा निकाल आता 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केला जाईल.

सर्वोच्च न्यायालयाची मुदत आणि सुधारित वेळापत्रक
या निवडणुका पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 नंतर केवळ 2 आठवड्यांची मुदत वाढवून दिली आहे. ही कायदेशीर मर्यादा लक्षात घेऊनच आयोगाने नवीन तारखा निश्चित केल्या आहेत. सुधारित वेळापत्रकाची अधिकृत सूचना 31 जानेवारी 2026 रोजी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध केली जाणार आहे. या निर्णयामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना प्रचारासाठी अतिरिक्त 2 दिवसांचा अवधी मिळाला आहे.

मतदान आणि मतमोजणीची नवी वेळ
नवीन वेळापत्रकानुसार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजल्यापासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. मतदानाच्या 48 तास आधी म्हणजेच 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता जाहीर प्रचाराची तोफ थंडावणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होताच संबंधित निवडणूक क्षेत्रातील आचारसंहिता संपुष्टात येईल. तसेच, निवडून आलेल्या नवीन सदस्यांची नावे 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *