सोनाळी / प्रतिनिधी

मंडलिक गटाचे सोनाळी ता. कागल येथील माजी सरपंच, युवा नेते व सुप्रसिद्ध उद्योजक सत्यजित पाटील- सोनाळीकर यांनी बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी युतीचे उमेदवार श्रीमती शोभाताई गणपतराव फराकटे, बोरवडे पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संभाजी सातापा फराकटे व सावर्डे बुद्रुक पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार डाॅ. इंद्रजीत पांडुरंग पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले. श्री. पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी हा निर्णय जाहीर केला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, सत्यजित पाटील- सोनाळीकर यांच्या मनात महिला, युवक यासह सामान्य माणसाच्या हिताच्या संकल्पना आहेत. त्या सत्यात उतरवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करु. ऐतिहासिक वळणावर मिळालेला पाठिंबा कधीही विसरणार नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युतीला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे.
सत्यजित पाटील- सोनाळीकर म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ यांचे सुरू असणारे जनहिताचे अखंडीत कार्य पाहून आपण प्रभावित झालो आहे. यापूर्वी ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा नियोजन तसेच हमिदवाडा कारखान्यात संचालक म्हणून काम करताना वेगळा ठसा उमटविला आहे. यापुढेही चांगल्या पद्धतीने काम करीत राहू.
हिऱ्याला मिळाले कोंदण…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, हिरा कितीही तेजस्वी असला तरी त्याला कोंदणाची गरज असते. सोनाळी गावाचा चेहरामोहरा बदलणारे माजी सरपंच सत्यजित पाटील यांना आता तसे कोंदण लाभले आहे. कार्यकर्त्यांच्या सुख दुःखात सहभागी होवून जीवाला जीव देणारे कार्यकर्ते निर्माण केल्यामुळेच आपण ३५ वर्षे राजकीय जीवनात सत्तेत राहू शकलो.
यावेळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, कैलाससिंह जाधव, राहुल मगदूम- महाडिक आदींसह प्रमुख मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
………..



