शिनोळी / प्रतिनिधी


माजी आमदार राजेश पाटील आणि डॉ. नंदाताई बाभुळकर यांची एकजूट झाली आहे. कल्लापा भोगण, विलासराव पाटील, ॲड. संतोष सुभाष देसाई, प्रभाकर खांडेकर, जगन्नाथ हुलजी, रवळू हदगल, नामदेव कदम या दिग्गजांची दिलजमाई झाली आहे. यामुळे चंदगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

शिनोळी ता. चंदगड येथे तुडये, कुदनुर, माणगांव, अडकूर या जिल्हा परिषद मतदारसंघांच्या व त्या अंतर्गत पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, तुम्ही या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आम्ही विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी देऊ. हा भाग डोंगराळ असल्यामुळे वन्यजीव प्राण्यांचा शेतकऱ्यांना होत असलेला त्रास, पिकांचे नुकसान यासाठी व्यापक उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन मंत्री गणेश नाईक यांना भेटू.

माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांनी चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागासाठी तब्बल १३०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळेच २२ हून अधिक जलसाठे निर्माण होऊन शेत- शिवारातून पाणी वाहतय. ऊसमळे डोलत आहेत, दूध उत्पादन वाढले आहे. साहजिकच; आपण सर्वजण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो आहोत. तसेच; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही ३०० कोटी निधी दिला आहे.


विनाशकाली विचार परतवूया……!
डॉ. नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, चंदगड तालुक्यात विनाशकाली विचाराने शिरकाव केला आहे. व्यसनाधीनता आणि ड्रगचा व्यापार वाढत आहे. हा विनाशकाली विकृत विचार परतवून लावूया. म्हणूनच ही निवडणूक तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आणि तरुणाईच्या भवितव्याची आहे.

व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भिकू गावडे, महिला तालुकाध्यक्षा सौ. संगीता पाटील, भरमाण्णा गावडा, कल्लाप्पा भोगण, विलासराव पाटील, ॲड. संतोष मळवीकर, नितीन पाटील, सुभाष देसाई, अशोकराव देसाई, प्रभाकर खांडेकर, डॉ. नामदेवराव निट्टूरकर, तानाजी गडकरी, गोपाळकर, जानबा चौगुले, अशोक पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
……….

शिनोळी ता. चंदगड येथे चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषद व चंदगड पंचायत समिती मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचारसभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, डॉ. नंदाताई बाभुळकर व उपस्थित जनसमुदाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *