सातवे / प्रतिनिधी


सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून डाॅ. जयंत पाटील यांच्यासह सातवी पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार माणिकराव पाटील व माले पंचायत समितीच्या उमेदवार सौ. भारतीताई पाटील यांचे प्रचंड मताधिक्यांचे विजय हीच कै. अजितदादा पवार व कै. यशवंत एकनाथ पाटील- दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल, असे भावनिक आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ माले ता. पन्हाळा येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, दुपारी बारा वाजताच्या भर उन्हातही या सभेसाठी तुम्ही सर्वजण एवढ्या प्रचंड संख्येने जमलात त्यावरूनच डॉ. जयंत पाटील यांच्यासह माणिकराव पाटील व भारतीताई पाटील प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, याची खात्री पटलेली आहे. येत्या काळात बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर व डॉ. जयंत पाटील यांच्या सहयोगाने ऊस शेतीमध्ये ए. आय.च्या वापराने ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहू, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर म्हणाले, सातवे जिल्हा परिषद मतदार संघ हा स्वर्गीय कै. यशवंत एकनाथ पाटील- दादा यांचा लाडका मतदारसंघ आहे. त्यांचा समर्थ वारसा त्यांचे सर्वच कुटुंबीय पुढे नेत आहेत. अमर पाटील यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कै. दादांचा तिसऱ्या पिढीतील सामाजिक वारसा चालवण्यासाठी डाॅ. जयंत पाटील उतरले आहेत. महिला संघटनाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोचलेल्या सौ. विनिताताई पाटील या रणरागिनी बनून त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. दादांचा हा वारसा समर्थपणे चालवण्यासाठी या मतदारसंघातील सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.

डॉ. जयंत पाटील म्हणाले, आजोबा कै. यशवंत एकनाथ पाटील- दादा, चुलते अमरभाऊ पाटील व आम्हा नातवंडांनी गावगाड्याची प्रामाणिक सेवा केली आहे. मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी हा जिल्हा परिषद मतदारसंघ दत्तक घ्यावा. त्यांच्या नेतृत्वाखाली खेड्यापाड्यातील ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छ व मुबलक पाणी, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा यासाठी कटिबद्ध आहे. लाडक्या बहिणींचा लहान भाऊ म्हणून सेवेत राहू. या विजयाने आपल्या गटाला निश्चितच चांगले दिवस येतील.

बोलणं कमी, काम जास्त…! यशस्वी फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा सौ. विनिताताई पाटील म्हणाल्या, सेवा ही सत्तेपेक्षा पुढेच असेल. बोलणं कमी आणि काम जास्त ही आमची पद्धत आहे. जेवढं फिरलो, जेवढ्यांना भेटलो त्या सगळ्यांमध्ये कै. यशवंत एकनाथ पाटील- दादाच बघितले. सातवे मतदार संघ , कोडोली मतदारसंघ आम्हाला परके नाहीत. शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, वैभववाडी तालुक्यात जिथे जाल तिथे सर्वत्र कै. दादांचेच नाव आहे. मातीचा कण अन कण फक्त कै. दादांचेच नाव सांगत आहे.

व्यासपीठावर आप्पासाहेब पाटील, किरणराव पाटील, अरविंद चौगुले, बाबुराव पाटील, आबाजी पाटील, महेश भोसले, माणिकराव पाटील, रघुनाथ चौगुले, वसंतराव पाटील, विलास पाटील, आप्पासाहेब मोरे, शहाजी पाटील, दादासाहेब पाटील- सावर्डेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
………..

माले ता. पन्हाळा येथे सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर प्रचारसभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, जिल्हा परिषद उमेदवार डाॅ. जयंत पाटील व समोर उपस्थित जनसमुदाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *