आलास / प्रतिनिधी

राजकारणात विरोध असूदे, द्वेष नको. आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर एका बाजूला राजर्षी शाहू विकास आघाडी व मित्रपक्षांच्यावतीने विकासाची भूमिका मांडत आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या द्वेषाने पछाडलेले विरोधक आहेत. श्री. यड्रावकरांच्या द्वेषाने पछाडलेल्या विरोधकांना पराभूत करा आणि राजर्षी शाहू विकास आघाडी आणि मित्रपक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

आलास व अब्दुललाट येथे शिरोळ तालुक्यातील राजर्षी शाहू विकास आघाडी व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर प्रचार सभेत श्री. मुश्रीफ बोलत होते.

भाषणात मंत्री पुढे म्हणाले, आमदार डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास केला आहे. अडीच हजारहून अधिक कोटी निधी गेल्या पाच -सहा वर्षात त्यांनी या भागासाठी आणलेला आहे. परंतु; विरोधक मात्र केवळ द्वेषाने पछाडलेले आहेत. त्यांचे विरोधक सातत्याने त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, मी आणि श्री. यड्रावकर प्रचंड निधी देऊ कन्यागत महापर्वकाळासाठी एक हजार रुपये निधी मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील राहू.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली आम्ही सगळ्याच समविचारी लोकांना एकत्र घेऊन जात आहोत. आघाडीला चांगले यशही मिळाले. परंतु; काही लोकांनी महायुतीपेक्षा विरोधकांनाच फायदा होईल, अशी वेगळीच भूमिका घेतली. अशी भूमिका घेणारेच एखाद्या पक्षाची “बी टीम” म्हणून काम करीत आहेत.

श्री. यड्रावकर पुढे म्हणाले, मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाने सगळी प्रलंबित कामे पूर्ण करीत आहोत. जयसिंगपूरला शिवसृष्टी उभारली लवकरच भीमसृष्टी उभारणार आहोत. क्षारपड मुक्तीसाठी ३४ गावांचा सर्वे झाला आहे. पाच किलोमीटरच्या आतच प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे, ही भूमिका घेऊन उद्योग- व्यवसाय निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आरोग्य व्यवस्था बळकटीकरणाचा भाग म्हणून तालुक्याची ९० बेड्सची क्षमता आज ९०० बेड्सवर चालली आहे.

जातीयवादी विरुद्ध बहुजनवादी…..!
आमदार डॉ. यड्रावकर म्हणाले, आम्ही गट- तट, पक्ष, जात -धर्मविरहित लोकांच्या गरजा काय आहेत ते पाहून कामे करीत आहोत. विरोधकांचे पॅनेल हे जातीयवादावर आधारित आहे. आम्ही मात्र बहुजन समाजातील वंचित घटक घेऊन विकासाच्या वाटेवरून जात आहोत. आम्ही केलेला आणि करणार असलेला विकास मांडत आहोत. विरोधकांनीही जातीपेक्षा काम सांगावे आणि मते मागावित.

व्यासपीठावर माजी आमदार उल्हासदादा पाटील, धनाजीराव जगदाळे, अमरसिंह माने-पाटील, रणजीत पाटील, महावीर पोमाजे, अमोल हिंगणगावे आदी प्रमुख उपस्थित होते.
…………

आलास ता. शिरोळ येथे राजर्षी शाहू विकास आघाडी व मित्रपक्षांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर व समोर उपस्थित जनसमुदाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *