कोल्हापूर / प्रतिनिधी

केडीसीसी बँक ही कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. तुम्हा कर्मचाऱ्यांची ती आई आहे. तिला प्राणपणाने जपा, असे भावनिक आवाहन बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. केडीसीसी बँक महाराष्ट्रातील सर्वोच्च पगार देणारी बँक आहे. बँकेशी प्रतारणा न करता इमाने इतबारे सेवा भावनेने व जबाबदारीने काम करा, असेही ते म्हणाले.
बँकेच्या कोल्हापुरातील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. बँकेने दिलेला ठेव इष्टांक पूर्ण केलेल्या ८३ शाखांना गौरव चिन्ह व सन्मानपत्र देऊन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळांच्या हस्ते गौरव झाला.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, या बँकेच्या जीवावरच आपण भाकरी खातो, संसार फुलवतो, मुला बाळांना शिकवतो. बँकेसाठी कर्तव्य भावनेतून जबाबदारी समजून घ्या आणि बँकेसाठी वेळ द्या. बँक शेतीसह, व्यवसाय, कारखाने, दुकानदार अशासाठी सगळ्या प्रकारची कर्जे देत आहे. बँकेच्या या विविध योजना घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
□ उपकार भावनेने नव्हे कर्तव्य भावनेने सेवा करा…..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त शेतकरी हाच या बँकेचा मालक आहे. त्याची सेवा करताना व त्याच्यापर्यंत बँकेच्या योजना घेऊन जाताना त्याच्यावर उपकार करत आहोत, ही भावना मनामध्ये ठेवू नका. ती आपली जबाबदारी किंबहुना; कर्तव्यच आहे, या भावनेने काम करा. लाडक्या बहिणींना बँकेकडून उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी मिळणारे कर्ज ३० हजार रुपयांवरून एक लाखापर्यंत नेण्याचा संकल्प आहे. री- केवायसी बद्दल सतर्क राहून पूर्तता करा.
■ उद्दिष्ट मार्च 2026 अखेरचे…..!
□ ढोबळ नफा: ३०० कोटी
□ ठेवी: १३ हजार कोटी
□ शेअर्स: ३२५ कोटी
□ ढोबळ एनपीए: तीन टक्केच्या आत
□ सीआर एआर: १४ टक्के
□ नक्त एनपीए: शून्य टक्के
स्वागतपर भाषणात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जी. एम. शिंदे यांनी बँकेची वाटचाल, बँकेचे वर्षभरातील कामकाज, उद्दिष्टांची पूर्तता व चालू आर्थिक वर्षातील उद्दिष्टे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत अकाउंट्स विभागाचे व्यवस्थापक सुरेश काकडे, शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक राजू पाटील, व्यक्तिगत कर्जे विभागाचे व्यवस्थापक गिरीश माळी, आयटी विभागाचे व्यवस्थापक गिरीश पाटील, बोर्ड विभागाच व्यवस्थापक गजानन देसाई यांनी विभागनिहाय सविस्तर आढावा घेतला.
■ या कार्यशाळेत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हटलेल्या शेरोशायरी अशा…….
□ जिस मेहनत से तू आज भाग रहा है,
वही कल तुझे सफलता दिलायेगी,
झोंक दे खुदको इस आग मे,
यही आग तुझे हिरा बनायेगी….!
□ मत सोच की तेरा सपना क्यों पुरा नही होता,
हिम्मतवालों का इरादा कभी अधूरा नही होता,
जिस इंसान के कर्म अच्छे होते है,
उसके जीवन मे हमेशा अंधेरा नही होता……!
□ हम रहे ना रहे बँक में,
तुम रहोगे नोकरी के आखरी दिनतक,
बँक की तरक्की करो आखरी दमतक…..!
□ जिंदगी ने मुझे यही सिखाया है की,
मेहनत करो रूको मत,
और हालात कैसे भी हो,
किसी के आगे झुको मत……!
□ इंसान को कभी हिम्मत नही हरनी चाहिये,
क्योंकी; पहाडो से निकली हुई नदीने
आज तक रास्तेमें किसी को पूछा नही की,
समंदर कहा है…..!
व्यासपीठावर संचालिका व माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, विजयसिंह माने, रणवीरसिंह गायकवाड सौ. श्रुतिका शाहू काटकर, सौ. स्मिता गवळी, कर्मचारी प्रतिनिधी गजानन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
सूत्रसंचालन रामराव इंगळे यांनी केले. आभार संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी मानले.
………..



