
(मुंबई / प्रतिनिधी)
विधानसभा सभागृहात मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रत्येक शपथविधीला स्वर्गीय कै. अजितदादा पवार मला म्हणायचे, “मुश्रीफसाहेब…. माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच……!”
सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या श्रद्धांजलीपर प्रस्तावावर व्याकुळ झालेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत सकाळी दहा वाजता अजितदादा सभागृहात येणार. सभागृहात आल्यानंतर ते अध्यक्षांची भेट घेणार आणि बरोबर अकराच्या ठोक्याला ते आपल्या जागेवर येऊन बसणार. दुपारी जेवणासाठीच तेवढे बाहेर जाणार.ते सभागृहात सातत्याने सर्वच आमदारांकडे लक्ष देत असत. ते अतिशय हजर जबाबी होते. या सभागृहातील हेडमास्तर म्हणूनच काम करीत होते. वक्तशीरपणा हे तर त्यांचे मुख्य अंगभूत वैशिष्ट्य होते. कोणतीही मीटिंग असो त्या आधी अर्धा तास त्यांचा फोन खणाणणार. सर्वांना वेळेवरच उपस्थित राहावे लागणार. असा हा आमचा अत्यंत कडक शिस्तीचा नेता. त्यांना टापटीप अतिशय आवडायची. ते स्वतः व्यवस्थित राहायचे, दुसरे व्यवस्थित नसतील तर त्यांना तोंडावरच सांगायचे. मला खरोखरच आश्चर्य वाटतंय, जे पोटात तेच ओठात, असे रोखठोक अजितदादा होते. जे सत्य असेल तेच बोलणार. बारामतीमधून सल्लग आठवेळा लाख- दीड लाखाहून अधिक मताधिक्याने जिंकणारे त्यांचे नेतृत्व होते.
अजित दादांच्या कडे घेऊन गेलेले योग्य काम असेल ते होणारच. त्यांचा अधिकाऱ्यांवर आणि प्रशासनावर प्रचंड वचक होता. जर काम योग्य असेल तर गट, पार्टी, जात, धर्म काही बघत नव्हते. ते काम ताबडतोब कसं पूर्ण होईल यासाठी सातत्याने ते प्रयत्न करायचे.
कै. अजितदादा आणि मी एकाचवेळी जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये आलो. ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आलीमे आणि मी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आलो. त्यावेळेपासून माझे आणि त्यांचे ऋणानुबंध घट्ट झाले. साखर कारखानदारी आणि बँक याबाबत त्यांची काही मते होती. अलीकडच्या काळात तर विशेषता साखर कारखानदारी कशी तोट्यात आहे, एफ. आर. पी. कशी वाढत आहे. को-जनचे दर कसे कमी येत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे सरकार इथेनॉल घेत नाही याबाबत सातत्याने मला सांगत असत. म्हणून ते एकदा केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमितभाई शहा यांना भेटून आले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना भेटले. साखरेची एमएसपी वाढत नाही, इथेनॉल घेतलं जात नाही अशा प्रश्नांबाबत सातत्यांचा पाठपुरावा असायचा.
आता बँकिंग रेग्युलेटरी ॲक्टनुसार बँकेच्या संचालक पदावर सलग दहा वर्षानंतर राहता येणार नाही अशी तरतूद आहे. त्याबद्दल ते म्हणाले होते, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा यांना भेटू त्यांना आपण सांगूया, की एखादा संचालक चुकीचे काम करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. परंतु; एकेका ठिकाणी काही काही व्यक्ती आहेत म्हणून लोक ठेवी ठेवतात. हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला पाहिजे ही भूमिका ते सातत्याने मांडायचे. अजितदादांचे कोल्हापूरवरही फार मोठे प्रेम होते. बारामतीवर तर साहजिकच प्रेम होते. तसेच; कुठलीही चांगली गोष्ट बारामतीत आलीच पाहिजे आणि ती चांगलीच केली पाहिजे, असा त्यांचा अट्टाहासच होता.
” मुश्रीफसाहेब, तुमची शपथ होणारच…..!”
श्री. मुश्रीफ म्हणाले, १९९९ साली मी पहिल्यांदा निवडून आलो आणि दोन महिन्यातच त्यांनी मला मंत्री केले. कोल्हापूर जिल्ह्यात त्यावेळी स्वर्गीय कै. बाबासाहेब कुपेकरसाहेब आणि स्वर्गीय कै. दिग्विजय खानविलकरसाहेब हे दोन मंत्री असताना मला तिसरा मंत्री केले. आजअखेर मी सलग सहावेळा निवडून आलो आणि नऊवेळा मंत्रीपदाची शपथ घेतली. अजितदादा मला नेहमी म्हणायचे, “मुश्रीफसाहेब, माझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच.”



