कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची आणि सोयीच्या वेळेत दळणवळण सेवा सुरू होत आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या वतीने येत्या २९ मार्चपासून, कोल्हापूर ते मुंबई दरम्यान दररोज सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळा विमान सेवा सुरू होत आहे. त्यामुळं कोल्हापुरातून सकाळी मुंबईला जाऊन दिवसभरात कामं आटोपून सायंकाळी पुन्हा कोल्हापूरला येणं शक्य होणार आहे. तर मुंबईहून कोल्हापूरला येणार्‍या पर्यटक, उद्योजक आणि भाविकांनाही या नव्या विमानसेवेचा फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. इंडिगोकडून सुरू होणारी कोल्हापूर ते नवी मुंबई ते कोल्हापूर ही विमानसेवा तुलनेनं अधिक किफायतशीर दरात मिळणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जाण्यासाठी अनेक महत्वाच्या शहरांची उत्तम एअर कनेक्टिव्हीटी आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू असली, तरी केवळ सकाळच्या वेळेस ही विमानसेवा सुरू आहे. अशा परिस्थितीत सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू व्हावी, ही काळाची गरज होती. सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर, येत्या २९ मार्चपासून इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर ते नवी मुंबई ते कोल्हापूर अशी दुहेरी विमानसेवा सुरू होत आहे. रोज सकाळी आणि सायंकाळी सुरू होणार्‍या या विमानसेवेचे दर सर्वांना परवडणारे असतील, त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी आनंद व्यक्त करून, उद्योजक, पर्यटक आणि भाविकांसाठी ही दुसरी विमानसेवा सोयीस्कर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळीं स्टार एअरलाईन्सकडून आठवड्यातून चार दिवस मुंबई आणि अहमदाबादसाठी विमान सेवा सुरू झाली आहे. त्याबद्दल कोल्हापूर विमानतळाचे सर्व तांत्रिक अधिकारी आणि कर्मचारी तसेच विमानतळ संचालक अनिल शिंदे यांचेही खासदार महाडिक यांनी आभार मानले. कोल्हापूर ते नवी मुंबई मार्गावर सुरू होणारी विमान सेवा रोज सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ८ वाजता उपलब्ध असेल. तर स्टार एअरलाईन्सकडूनही आठवड्यातून चार दिवस मुंबईसाठी दुपारी ४:३० वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता विमान सेवा सुरू केली आहे. शिवाय कोल्हापूर अहमदाबाद मार्गावर सुध्दा हवाई सेवा सुरू झाल्याने, जागतिक नकाशावर कोल्हापूरचे नाव अधिक ठळक बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *