( कागल /समाधान म्हातुगडे )
नानीबाई चिखली, कागल तालुका ही माझी जन्मभूमी आहे. या तालुक्याचा सुपुत्र आणि स्वाभिमान म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.
नानीबाई चिखली ता. कागल येथे नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते.
प्रा. मंडलिक पुढे म्हणाले, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक ज्यावेळी समाजकारणात राजकारणात होते, त्यावेळी संपूर्ण कागल तालुका आवर्षणग्रस्त होता. वेदगंगा, दूधगंगा, चिकोत्रा या तिन्ही नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत असा त्यांचा अट्टाहास होता. पाटबंधारे मंत्री झाल्यावर त्यांनी कामाला सुरुवात केली. पुढे पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी पूर्तता केली. त्यामुळेच पावसाळ्यानंतर कोरड्या पडणाऱ्या सर्व नद्या आणि कालवे बारमाही वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात जन्मलेला प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसदारच आहे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करण्यासाठी ही निवडणूक आता कार्यकर्त्यांनीच हातात घ्यायला हवी. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारापर्यंत जा, मतदारांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करा. मात्र; संजय मंडलिक यांना आपण विधानसभेच्या दृष्टीने कोणतीही अट घालू नये. आमचं जे व्हायचे ते होऊ दे, आमची लढत ठरलेली आहे. असे कार्यकर्त्यांना संबोधित करीत मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, स्व. मंडलिक यांनी आराखड्यात नसतानाही वेदगंगेला पाणी सोडून संपूर्ण नदीकाठ परिसर सुजलाम सुफलाम केला. कालव्यांची जबाबदारी मात्र माझ्यावर सोपवली. त्यांनी अशाच पद्धतीने कागल तालुक्यामध्ये विकास कामांचा पाया घातला आणि त्या कामावर कळस चढवण्याचे भाग्य मला मिळाले.
पिक्चर अभी बाकी है…..!
भाषणात प्रा. मंडलिक म्हणाले, नानीबाई चिखली जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या एवढ्या प्रचंड उपस्थितीमुळे माझ्या मोठ्या मताधिक्याची खात्री मला पटलेली आहे. “ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है….” असे म्हणताच उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान, बिद्री साखर कारखान्याची माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील- कुरुकलीकर, सौ. दिपाली कुदळे- खडकेवाडा, सुदाम देसाई- अर्जुनी, भाऊसाहेब पाटील- बेळुंकी यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी भोसले, शशिकांत खोत, विश्वास कुराडे, शहाजी यादव, श्रीमती सुमन लकडे, तुकाराम ढोले, नंदकुमार घोरपडे, भूषण पाटील, आर. व्ही. पाटील, मयूर आवळेकर, ॲड. जीवनराव शिंदे, डी. पी. पाटील, तुकाराम देसाई, नंदकुमार पाटील, वसंतराव शिंदे, नारायण ढोले, संदीप खोत, युवराज जाधव, संजय चितारी आदी उपस्थित होते.
स्वागत सरपंच अल्लाबक्ष सय्यद यांनी केले. प्रास्ताविक संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सदाशिव दुकान यांनी केले. आभार बशीर नदाफ यांनी मानले.