बानगे / प्रतिनिधी
छत्रपती शाहू महाराजांनी सिद्धनेर्ली, ता. कागल येथील दलित समाजाला कसण्यासाठी साडेपाच एकर जमीन दिली होती. हि जमीन समरजीत घाटगेंनी पोलीस बळाचा वापर करून काढून घेतली आहे. माझे हे वक्तव्य खोटे असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान वैद्यकीय शिक्षण विशेष सहाय्य मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
बानगेसह आनुर येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजयबाबा घाटगे, बिद्री संचालक आर. व्ही. पाटील व रवींद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, मिळालेला सत्तेचा वापर करीत मतदार संघातील मूलभूत सोयी सुविधांचा अभ्यास करून नियोजनबद्ध विकास केला आहे. शासनाच्या सर्वच योजना गाव खेड्यातील वाड्या वस्त्यांवर प्रभावीपणे राबवल्या. या माध्यमातून दिनदलित, वंचित, उपेक्षित लोकांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून मला अभिमान वाटतो.
माजी आमदार संजयबाबा घाटगे म्हणाले, अल्पसंख्यांक समाजातील असतानाही आपल्या स्वतःच्या कार्यकर्तृत्वातून मंत्री मुश्रीफ यांनी खूप मोठा जनाधार मिळवला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत ही गटा-तटांच्या पलीकडची आहे. म्हणूनच या तालुक्याचा सर्वांगीण विकास होताना व्यक्तिगत विकासापर्यंतही त्यांचे कार्य पोहोचले आहे. अशा या असामान्य नेत्याची जपणूक करण्याची गरज असल्याने आमच्या गटाने त्यांना पाठिंबा दिला असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन माजी आमदार श्री. घाटगे यांनी केली.
सागर कोळी म्हणाले, शाहू कारखान्याच्या निवडणुकीत संजयबाबा गटाच्या कार्यकर्त्यांच्यावर तुफान दगडफेक झाली होती. शाहू साखरच्या कार्यस्थळावर संजय बाबांचं रक्त सांडलं होतं, हे आपण विसरून चालणार नाही. याचा बदला घेण्याची वेळ आली आहे.
यावेळी रमेश सावंत, राजेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दत्ता सावंत, शशिकांत गुरव, निवृत्ती पाटील आदी उपस्थित होते. तर आनुर येथे बाबुराव नरके, बाळासाहेब चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मंडलिक कारखान्याच्या संचालिका सौ. राजश्री चौगुले, सरपंच काकासाहेब सावरकर, उमेश पाटील, दत्ता आरडे, रेखाताई तोडकर, रवी सावरकर, पांडुरंग खेडे, सुरेश बेनाडे, सुरेश चौगुले यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
…………..
वचपा काढणारच…!
गोकुळ दूध संघाचे संचालक अमरीश घाटगे म्हणाले, गेल्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये आमचा पराभव झाला. आमचा हा पराभव मुश्रीफ साहेबांनी नाही तर तर समरजीत घाटगे गटाने केला केला आहे. त्यामुळे आमच्या गटाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या निवडणुकीत तो वचपा काढण्याची संधी आली आहे. ती दवडायची नाही.
……………