December 23, 2024

बामणी /प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षात मतदार संघामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून सात हजार कोटी रुपयांची विकासकामे झाली. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेशा अशा राज्यात एक नंबर मताधिक्याने त्यांना निवडून आणूया, असे आवाहन माजी खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांनी केले.

बामणी ता. कागल येथील आर. के. मंगल कार्यालयात आयोजित मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ जाहीर भगव्या मेळाव्यात ते बोलत होते.

माजी खासदार श्री. मंडलिक पुढे म्हणाले, मंडलिक व मुश्रीफ गट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यापूर्वी जे काही झालं ते गंगेला मिळालं. आत्ताच्या घडीला मंत्री मुश्रीफ निवडून आले पाहिजेत, यासाठी आम्ही महायुतीचे घटक म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कार्यकर्त्यांची जागा हृदयात असते हे तत्व तसेच; संघर्ष करण्याचे तत्व स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी शिकविले. त्यांनी घालून दिलेल्या व गोरगरीब जनतेचे कल्याण, संघर्ष आणि स्वाभिमान या वाटेवरूनच आजही वाटचाल करीत आहे. त्यामुळेच गोरगरीब जनता कधीच नजरेआड होऊ दिली नाही. यापुढे आपल्या गटाची एकही तक्रार येणार नाही आणि कोणाचाही विश्वासघात होणार नाही, असे काम आपण करू. मंडलिक गटाने या निवडणुकीत ऐतिहासिक वळणावर मला पाठबळ दिलं आहे. त्यामुळे; माझा विजय लाखावर मतांनी होणार यात शंका नाही.

अतुल जोशी म्हणाले, दरबारी राजकारणाच्या विरोधात आपण अनेक वर्ष संघर्ष केला. आताही त्याविरोधात लढायचं आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोरगरीब जनता हीच नेहमी केंद्रस्थानी ठेवली आहे. सर्वसामान्य माणूसच क्रांती करू शकतो, असे सांगताना ते पुढे म्हणाले, जात-पात आणि पक्ष, पार्टीच्या पलीकडे जाऊन मुश्रीफांनी कागलच नाव देशाच्या नकाशावर आणलं आहे. म्हणूनच सामान्य जनतेने त्यांना उचलून धरले आहे.

पक्ष निरीक्षक राजाराम मांगले म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल विधानसभा मतदारसंघात प्रचंड मोठी कामे केली आहेत.

यावेळी वीरेंद्र मंडलिक, दादा पाटील, भिकाजी मगदूम, एन. एस. चौगले, विलास पाटील, भगवान पाटील, रूपालीताई पाटील, शहाजी गायकवाड, बी. डी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह मंडलिक साखर कारखान्याचे सर्व संचालकांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक सुधीर पाटोळे यांनी केले

लढाई कुटील प्रवृत्तीविरूध्द……
मंत्री मुश्रीफ म्हणाले, या निवडणुकीत आपली लढाई कटकारस्थानी, कुटील व रड्डीचा डाव खेळणाऱ्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे अतिशय सावधगिरीने ही निवडणूक करण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी.

स्वर्गीय मंडलिकसाहेबांचा वारसा….

अतुल अतुल जोशी म्हणाले, कोल्हापूर जिल्हा ही राजर्षी शाहू महाराजांची पुरोगामित्वाची भूमी आहे. या भूमीत स्वर्गीय दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा छत्रपती शाहू, फुले व आंबेडकरांचा पुरोगामित्वाचा वारसा मंत्री हसन मुश्रीफ समर्थपणे चालवीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *