बाचणी / प्रतिनिधी
विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे ते निंदानालस्ती, बदनामी, आरोप आणि टीकाटिपणीवर उतरले आहेत. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्याएवढे काम राज्यात अन्य कोणीही केलेले नाही. त्यांच्या प्रचंड मताधिक्यासाठी ताकद द्या, असे आवाहन पंचायत समितीचे माजी उपसभापती भूषण पाटील यांनी केले. खरंतर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला पाहिजे होती. परंतु; विरोधक विरोधासाठी विरोध म्हणून ही निवडणूक लढवत आहेत, असेही ते म्हणाले.
बेलवळे बुद्रुक ता. कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट जाहीर सभेत ते बोलत होते.
शेतकऱ्यांचे नेते प्रा. जालिंदर पाटील म्हणाले, ही निवडणूक राजवाडा विरुद्ध गावगाडा, राजा विरुद्ध रयत अशीच आहे. पुरोगामी कागल तालुक्याने यापूर्वी रयतेलाच प्राधान्य दिले आहे. याच रयतेने स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांना शिखरावर पोहोचवले. त्याच पद्धतीने मंत्री हसन मुश्रीफ यांनाही शिखरावर पोहोचवले आहे. श्री मुश्रीफ जातीपातीचा चक्रव्यूह भेदून प्रचंड मताधिक्याने विजय होतील.
हसन मुश्रीफ म्हणाले, वंचित, उपेक्षित शोषित आणि पीडित यांच्या कल्याणाचा ध्यास हाच माझ्या राजकारण आणि समाजकारणाचा गाभा आहे. या अत्यंत वेगळ्या वळणावर असलेल्या निवडणुकीत जे जे मदतीसाठी धावून आले, त्यांचे उपकार हयातभर विसरणार नाही. सामाजिक जीवनात कधीच कुणाशी कायमचे वैरत्व, खुन्नस आणि शत्रुत्व धरले नाही. प्रत्येक माणूस माझ्याकडे माझ्या हातात जनतेने शक्ती दिली आहे, या भावनेने येत असतो. म्हणूनच मीही प्रत्येकाला खुल्या अंतकरणाने मदत करत आलो आहे.
यावेळी गोकुळचे संचालक अमरीशसिंह घाटगे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, विजय काळे, दत्ताजीराव देसाई, नारायण पाटील, उसेद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले.
मुश्रीफांनी शेतकऱ्यांना दिलेले शब्द पाळले…
शेतकऱ्यांचे नेते प्रा. जालंदर पाटील म्हणाले, मंत्री श्री मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिलेले सर्व शब्द तंतोतंत पाळले आहेत. गतवर्षी ज्या साखर कारखान्यांनी प्रति टन तीन हजार रुपयेपर्यंत दर दिला आहे. त्यांनी शंभर रुपये व तीन हजार रुपयांच्या वरती दर दिला आहे. त्यांनी पन्नास रुपये शेतकऱ्यांना द्यावेत म्हणून आम्ही जेव्हा मंत्री मुश्रीफ यांना घेरले होते, त्यावेळी त्यांनी कारखानदार आणि संघटनांच्यामध्ये मध्यस्थी करून हा शब्द पाळला. म्हणूनच अशा नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही आलो आहोत. जातीपातीचे चक्रव्यूह भेदून ते विक्रमी मताधिक्याने विजयी होतील.