चिमगाव / प्रतिनिधी
समरजीत घाटगे आणि गोरगरिबांचे कल्याण, सेवा यांचा काडीमात्र संबंध नाही. सत्तेचा वापर त्यांनी फक्त स्वतःच्या ईस्टेटी वाचविण्यासाठीच केला आहे, असा घनाघात मुरगुडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी केला.
चिमगांव ता. कागल येथील जाहीर सभेत पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, बिद्रीचे संचालक सुनीलराज सूर्यवंशी, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष धनराज घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, माझी नियत साफ आहे. तितकीच माझी दानतही आहे. सर्व सामान्य जनतेचा मला कायमच आशीर्वाद आहे. या तीन गोष्टी जोपर्यंत माझ्याकडे आहेत, तोपर्यंत माझा कोणीही पराभव करू शकत नाही. महायुती सरकार सर्व घटकांना न्याय देण्यात यशस्वी झाले आहे. तसेच; लाडकी बहीण योजना तर प्रभावीच ठरली आहे.
यावेळी धनराज घाटगे म्हणाले, मंत्री श्री मुश्रीफ यांच्या सानिध्यात आम्ही आलो, तेव्हापासून साहेबांचं कार्यकर्तृत्व किती मोठे आहे, हे आम्ही जवळून बघितलं आहे. विरोधक मात्र केवळ काम न करता फक्त दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. कागल परिसरामध्ये आल्यानंतर मुरगुड-कापशी परिसरातील चुकीच्या वावड्या उठवायच्या आणि त्या परिसरात गेल्यानंतर कागल परिसरातील वावड्या उठवून लोकांना संभ्रमावस्थेत ठेवायचे. हाच त्यांच्या समोर अजेंडा आहे.
यावेळी सरपंच सौ. रुपाली आंगज, विजय काळे, संदीप मुसळे, सर्जेराव अवघडे यांनी मनोगत व्यक्त केले. नारायण मुसळे, नारायण ऐकल, सौ. प्रमिला नाईक, आनंदा करडे, संजय करडे आदी उपस्थित होते.
निंदानालस्ती, टीकाटिपणी, आरोप हाच त्यांचा अजेंडा…..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत सात हजार कोटी रुपयांची कामे केली. त्या कामांचे पुस्तक तयार करून सर्वत्र घराघरांमध्ये पोहोचविले. समरजीत घाटगेनी त्यातील एक जरी कामाची प्रशासकीय मान्यता नाही, हे सिद्ध करावे. दुसऱ्या बाजूला एकही काम न करता केवळ निंदानालस्ती, टीकाटिपणी, आरोप करून जनतेची दिशाभूल करीत मते मागत आहेत.