December 22, 2024

(समाधान म्हातुगडे/ विशेष वृत्त)

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटल्याची चर्चा असून मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.आज सकाळी 11 वाजता लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राजीनामा देणार आहेत. तर नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुन्हा मुख्यमंत्री व्हावे,अशी शिवसेनेच्या आमदारांची, नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी सूत्रांची माहिती आहे. २६ तारखेला सरकारचा कार्यकाल संपत असून आज नव्या मुख्यमंत्री पदाची शपथ होते का की शपथविधी सोहळा पुढे ढकलला जातोय याचीच उत्सूकता संपूर्ण महाराष्ट्राला लागून राहिली आहे. 1 मुख्यमंत्री व 2 उपुख्यमंत्री असा पॅटर्न कायम राहणार आहे.

शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून वर्षा या निवासस्थानी जमण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले मतदारांचे आभार-विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेनेवर मतांच्या माध्यमातून जो स्नेहाचा वर्षाव केला, जो विश्वास दाखवला तो आम्ही कधीही विसरणार नाही.

आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू…

चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊया, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मतदारांचे आभार मानले आहेत.मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत यासाठी आरती-महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी पुन्हा एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघात लाडक्या बहिणींच्यावतीने गणपती मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांची मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच विराजमान व्हावेत, अशी इच्छा असताना आता ठाण्यात महिलांकडून सामूहिक आरती करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *