वाशिम / प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आज पहिल्यांदाच वाशिममध्ये आगमन झाले. त्यांच्या या दौऱ्यामुळे जिल्ह्यात विकासाची नवीन पहाट उगवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आज संध्याकाळी ६:४५ वाजता, पालकमंत्री हसन मुश्रीफ वाशिम येथील शासकीय विश्रामगृहात पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली देवकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
या पहिल्या दौऱ्यात पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांनी वाशिमच्या विकासाचा आढावा घेतला. स्थानिक लोक प्रतिनिधी, जिल्हा प्रशासनासमवेत जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, शेती व उद्योग यांसारख्या प्रमुख विषयांवर चर्चा केली.
याशिवाय, त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
त्यांनी पहिल्याच दौऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला.
त्यांचे पालकत्व जिल्ह्यासाठी नवी संधी आणि वेगवान विकास घेऊन येईल.अशी आशा व्यक्त केली जात आहे.



