(कोल्हापूर / प्रतिनिधी)
चंदगड तालुक्यातील जीबीएसची लागण झालेल्या एका महिलेचा काल (गुरुवारी) रात्री सीपीआरमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील साठ वर्षाच्या गौराबाई गावडे यांना जीबीएसची लागण झाली होती. यावर उपचार घेण्यासाठी त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सद्या सीपीआरमध्ये जीबीएसची लागण झालेले 8 रुग्ण असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिली आहे.
दरम्यान, गौराबाई गावडे या यल्लमा देवीच्या यात्रेसाठी सौंदती येथे गेल्या होत्या. आठ दिवसांच्या मुक्कामादरम्यान दुषित पाणी आणि दुषित अन्नामुळे त्यांची प्रकृती बिघडली. गावी आल्यावर त्यांनी उपचार घेतले. मात्र उपचारांना प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांना कोल्हापुरातील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले. तिथं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे चंदगड तालुका आरोग्याधिकारी डॉ. सोमजाळ यांनी सांगितले.



