(मुंबई / प्रतिनिधी )

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे’ असं भरणे यांनी म्हटलं आहे.

मुसळधार पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीची मागणी केली आहे. यावर बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले की, ‘ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत.’

गेल्या दोन महिन्यांमध्ये अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांतील 195 तालुक्यांना या पावसाचा फटका बसला आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 17 लाख 85 हजार 714 हेक्टर (42 लाख 84 हजार 846 एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या काळात 654 महसूल मंडळांमधील खरीप पिके धोक्यात आली आहे. सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता सरकारने शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *