(कोल्हापूर/ प्रतिनिधी)

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास प्रत्यक्ष उपस्थित राहूनही तांत्रिकदृष्ट्या ऑनलाईन गैरहजरी न लागलेल्या शिक्षकांनाही प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे करण्यात आली. मागणीचे निवेदन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रमेश होसकोटी यांनी स्विकारले आहे.

नोकरीची सलग बारा व बारा वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा आर्थिक लाभ दिला जातो. हा लाभ देण्यासाठी 2 जून ते 12 जून या कालखंडामध्ये दहा दिवसाचे रियल टाईम प्रशिक्षण राज्य पातळीभर घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये प्रत्येक तासिके नंतर राज्यस्तरावरून ऑनलाईन हजेरी घेण्यात आली. प्रत्यक्ष उपस्थित असूनही तांत्रिक कारणांनी अनेक शिक्षकांची हजरी न लागल्यामुळे ऑनलाईन गैरहजरी दिसून आली. राज्याचे शिक्षण व प्रशिक्षण संशोधन परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी 21 सप्टेंबर रोजी निर्धारित वेळेत सदर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनाच प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना दिले आहेत आहेत.

परंतु तांत्रिकदृष्ट्या ज्या शिक्षकांना प्रशिक्षणातील उपस्थितीसाठी अडचणी आल्या उदा. मूळ प्रशिक्षण यादीमध्ये नाव आहे पण प्रत्यक्ष वर्ग खोलीतील लावलेल्या यादीमध्ये नाव नाही, प्राथमिक शिक्षक यादीमध्ये नाव समाविष्ट न होता माध्यमिक शिक्षक यादी मध्ये नाव समाविष्ट झाले, किंवा प्रशिक्षण सुरू असताना तांत्रिकदृष्ट्या एखादे दिवस हजेरीना न लागल्यामुळे किंवा प्रशिक्षण स्थळी उपस्थित असूनही अन्य कोणत्याही कारणाने ऑनलाईन उपस्थिती न लागल्यामुळे, प्रशिक्षण कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या, स्वाध्याय पूर्ण केलेल्या, लेखी परीक्षा दिलेल्या, तसेच प्रकल्प किंवा नवोपक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांना सुद्धा प्रमाणपत्र वितरित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, राज्य प्रवक्ता पी.एस घाटगे, जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील, शहराध्यक्ष संतोष पाटील इत्यादी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ३७ शिक्षकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून १० दिवसांच्या प्रशिक्षणा बरोबर स्वाध्याय, प्रकल्प,नवोप्रक्रम व लेखी परीक्षा इ. प्रशिक्षणातील सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. त्यांना पुन्हा नव्याने प्रशिक्षण पूर्ण कराव्यास लागू नये यासाठी कोल्हापूर जिल्हासह तांत्रिकदृष्ट्या गैरहजेरी लागलेल्या राज्यातील सर्व शिक्षकांना सुद्धा प्रमाणपत्र देण्यात यावेत.”-

पी.एस.घाटगे, राज्य प्रवक्ता, खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *