केंद्र सरकारने साखरेची एम.एस.पी. प्रतिक्विंटल रु. ४,३०० करावी
कारखान्याच्या १२ व्या गळीताचा बॉयलर प्रदीपन उत्साहात
(बेलेवाडी काळम्मा / प्रतिनिधी)

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या १२ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मुश्रीफ बोलत होते. केंद्र सरकारने साखरेची एम. एस. पी. प्रतिक्विंटलला रु. ४, ३०० करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, चालू म्हणजेच सन २०२५-२६ हा हंगाम सरकारच्या आदेशानुसार दिलेल्या वेळेत सुरू करू. कारखान्याच्या सहवीज प्रकल्पामधून या हंगामात एकूण ११ कोटी युनिट्स वीजनिर्मिती करून त्यापैकी आठ कोटी युनिट्स वीज निर्यात करण्याचा कारखान्याचा संकल्प आहे. डिस्टलरीमधून रेक्टिफाइड स्पिरिट व इथेनॉल, असे एकूण तीन कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. तसेच; कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना दोन पगार म्हणजेच १६.६६ टक्के बोनस १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जमा केला जाणार आहे. यावर्षी पाऊसमान चांगले झाल्यामुळे ऊस उपलब्धताही योग्य प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपसाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.



