( विशेष वृत्तसेवा/ समाधान म्हातुगडे)

लहरी हवामान आणि बदलत्या वातावरणामुळे ऊसाचे उत्पादन यंदाही घटण्याची भिती आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून कार्यक्षेत्रातील सर्वच्या सर्व ऊस गाळप होण्यासाठी यंदा वाहतूक यंत्रणा वाढवली आहे. यंदा ऊसाचे गाळप अधिक व्हावे यासाठी बिद्री साखर कारखाना वीस कि. मी. अंतरासाठी वाहतूकदारांना प्रतिटनास ५७ रुपये जादा देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष, माजी आम. के. पी. पाटील यांनी केली.

बिद्री ( ता. कागल ) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेपुढील आठही विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजूरी दिली. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष के. पी. पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली.

आयत्यावेळच्या विषयात कोल्हापूर येथे सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल सबंधीतांच्या अभिनंदनाचा ठराव तसेच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ऊसाचे पंचनामे करुन अर्थिक मदत मिळावी, असाही ठराव मांडण्यात आला, याला सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, गेल्यावर्षी सुमारे तीन लाख मे. टन ऊसाचे गाळप कमी झाले. त्याचा परिणाम सहवीज प्रकल्प, इथेनॉल आणि मोलॅसिस उत्पादनावर झाला. येत्या हंगामात १० लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. यासाठी यंदा ऊस टोळींचे जादा शंभर करार कारखान्याने केले आहेत. त्यामुळे गाळप वाढण्यास मदत होणार आहे.

श्री. पाटील म्हणाले, गत हंगामात उसाचे उत्पादन घटल्याने ९० दिवसांत साडेसहा लाख मे. टन ऊसाचे गाळप झाले. आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून कारखान्याचे गाळप किमान १२० दिवस होणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्राबाहेरील ऊसही गाळपासाठी आणावा लागणार आहे. येत्या गळीत हंगामात उच्चांकी गाळपासह सर्वच उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस बिद्री कारखान्याकडे गळीतासाठी पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उपाध्यक्ष मनोज फराकटे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, यांच्यासह कारखान्याचे सभासद मोठ्या संखेने उपस्थित होते. स्वागत व विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी केले. तर आभार उपाध्यक्ष मनोज फराकटे यांनी मानले.

——————————————–

उस उत्पादन वाढीसाठी एआय ची मदत घेणार*बिद्रीच्या संचालक मंडळाने बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रावर जाऊन ए. आय. तंत्रज्ञानाची माहिती घेतली आहे. याविषयी आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत ७०० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. हे तंत्रज्ञान शेतीत वापरण्यासाठी हेक्टरी २५ हजार खर्च अपेक्षित आहे. यासाठी व्हीएसआय संस्थेकडून ९२५० , कारखान्याकडून ६७५० तर संबंधित शेतकऱ्याचा सहभाग ९ हजार रुपये असणार आहे. यासाठी जिल्हा बँकेकडून ६ टक्के व्याजाने ही रक्कम दिली जाणार आहे. यांमुळे ऊस उत्पादनात निश्चितच वाढ होईल असा विश्वास अध्यक्ष के. पी. पाटील यांनी व्यक्त केला.

————————-

औषध फवारणी करणाऱ्या ड्रोनचा खर्च कारखाना करणार

गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही उसावर लोकरी मावा, तांबेरा, पांढरी माशी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे ऊसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यासाठी ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारखान्याने यंदा सुमारे ११०० एकरावर ड्रोनने फवारणी केली. परंतू औषधे आणि ड्रोनच्या भाड्याचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही. त्यामुळे बिद्री साखर कारखाना ड्रोनच्या भाड्याचे सर्व पैसे भागवणार असून त्याचा ताण उत्पादकांवर पडणार नाही, असे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी जाहीर केले. याला सभासदांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.——————————————–फोटो ओळी :बिद्री : येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील, समोर उपस्थित सभासद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *