–          

(कोल्हापूर / प्रतिनिधी)

 कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व एन.डी.डी.बी. मृदा तसेच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून राबविण्यात येणाऱ्या ‘गोबरसे समृद्धी’ कार्बन क्रेडीट बायोगॅस योजनेचा तिसरा टप्पा सुरू होत असून, सन २०२५-२६ या वर्षासाठी ५,००० नवीन बायोगॅस युनिट्स मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी दिली आहे.

          गेल्या दोन टप्प्यांमध्ये गोकुळने ७,२०० दूध उत्पादक कुटुंबांपर्यंत बायोगॅस पोहोचवला आहे. या माध्यमातून महिला उत्पादकांना २४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध झाले आहे. परिणामी घरगुती खर्चात दरवर्षी लक्षणीय बचत होत आहे आणि महिलांना ऊर्जा स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळाला आहे.

          या योजनेअंतर्गत नव्या टप्प्यातील बायोगॅस मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. आधुनिक चार्जिंग लाइटर, शेण ढवळण्यासाठी मिक्सिंग टूल, अतिरिक्त सेफ्टी व्हॉल्व आणि पुनर्वापर करता येणारा फिल्टर यांचा समावेश करण्यात आला आहे. वस्तू व सेवाकर (GST) कपात झाल्यामुळे बायोगॅस युनिटच्या किंमतीतही घट झाली आहे. २ घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस युनिटची किंमत ४१,२६० रुपये असून, अनुदानानंतर केवळ ९,३६६ रुपये उत्पादकाने भरणे आवश्यक आहे. बायोगॅसचे अंतर १५० फुटांपेक्षा जास्त असल्यास बुस्टर पंपासाठी १,५०० रुपये भरावे लागतील.

          या योजनेमुळे गॅस सिलेंडरवरील वार्षिक १५ ते १८ हजार रुपयांची बचत होत असून, बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्याने खतांच्या खर्चात ३० ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळाली असून, पर्यावरणपूरक शेती प्रणालीचा प्रसार होत आहे. यामुळे केवळ इंधनच नव्हे तर शेतीच्या उत्पादनात टिकाऊपणाही वाढत आहे. गोकुळकडून या योजनेबाबत परिपत्रक जारी करण्यात आले असून, कोल्हापूर जिल्हा तसेच सीमाभागातील गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांचे उत्पादक या योजनेस पात्र आहेत.‘गोबरसे समृद्धी’ ही केवळ ऊर्जा निर्मिती नव्हे, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा आहे. प्रत्येक दूध उत्पादकाने या योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले.

माहितीसाठी

अन.क्षमताएकूण रक्कमउत्पादकांनी भरावयाचीनवी रक्कम
२ घन मीटर४१,२६०९,३६६/-
२.५ घन मीटर४९,५००९,८४४/-
३ घन मीटर६५,५००१३,८६६/-
५ घन मीटर९३,५००२२,४९१/-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *