
( सरवडे / विजय पाटील )
राज्याच्या कृषी विभागाचे बोधचिन्ह ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले. आधुनिक शेती व कृषी विभागाच्या मुलभूत बदलांमुळे हे बोधचिन्हाची रचना कालबाह्य ठरु लागली. त्यामुळे सध्याच्या काळात प्रभावी व सृजनशील ठरणारे नवीन बोधचिन्ह व ‘शाश्वत शेती-समृद्ध शेती’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. यापुढे कृषि विभागाच्या सर्व प्रचारात्मक उपक्रमामध्ये नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य प्रदर्शित करण्यात येणार आहे.
सन १८८१ च्या फेनीन कमीशनने शिफारस केल्यानुसार जुलै १८८३ मध्ये कृषि खात्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मे १९८७ च्या शेतकरी मासिकाच्या अंकामध्ये कृषि विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्रथम वापरण्यात आले. सद्यस्थितीत कृषि विभागाचे वापरले जात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य हे ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. आधुनिक शेतीच्या दृष्टीकोनात व विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या मूलभूत बदलांच्या पार्श्वभूमीवर या बोधचिन्हाची रचना/दृश्य व संवादात्मक ओळख कालबाह्य ठरू लागली आहे. यामुळे सध्याच्या काळामी सुसंगत, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करण्याची गरज निर्माण झाली.
त्यानुसार कृषि विभागाचे ‘कृषी कल्याण कर्तव्यम’ वाक्य असलेले बोधचिन्ह व ‘शाश्वत शेती -समृध्द शेती’ घोषवाक्य निश्चित केले असून नवीन बोधचिन्ह व घोषवाक्य वापरण्यास मान्यता दिली आहे. तर कृषि विभागाचे पुर्वी वापरात असलेले बोधचिन्ह व घोषवाक्य यांचा अन्य कोणाकडूनही गैरवापर होऊ नये या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही कृषी आयुक्तांनी करावी असे सुचीत करण्यात आले आहे.
बोधचिन्ह व घोषवाक्यातबदल
जुन्या बोधचिन्हावर फक्त शेतकऱ्याचे चित्र होते. नवीन बोधचिन्हावर गाय, ट्रॅक्टर, रोप, संशोधन साधने याची चित्रे वापरण्यात आली आहेत. त्यामुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा त्यामध्ये समावेश दिसून येतो. शिवाय बोधचिन्हावर असलेल्या ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ या ओळी काढून त्यावर ‘कृषि कल्याण कर्तव्यम’ या ओळी वापरण्यात आल्या आहेत. बदलत्या कृषी क्षेत्रानुसार साजेशे बोधचिन्ह तयार करून ‘शाश्वत शेती -समृद्ध शेती’ हे घोषवाक्य देखील नवीन करण्यात आले आहे.




