( कागल /प्रतिनिधी )

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येकवेळी अनपेक्षित अशा राजकीय घडामोडी पहायला मिळतात. राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले समरजित घाटगे यांची समझोता एक्सप्रेस २४ तासात वेगाने धावल्याने जिल्ह्याच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या..जनता देखील संभ्रमात तर कार्यकर्ते व जनतेतून उलट सुलट प्रतिक्रिया जरी येत असल्या तरी हे राजकारण असते.. राजकारणात असे घडतच असते. याचीच प्रचिती कागल नगरपालिका निवडणुकीत पहायला मिळत असून पहिल्याच दिवशी सेहरनिदा मुश्रीफ बिनविरोध निवडून आल्या आहेत. यामुळे यापुढे अनेक राजकीय धमाके होणार हे स्पष्ट होत आहे.
कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणात मोठा बदल घडवत कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या युतीने स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे.
या नव्या आघाडीमुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच प्रभाग क्रमांक ९ मध्ये अनपेक्षित घडामोड झाली आहे.बुधवारपासून उमेदवारी अर्ज माघारीस सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. शिवसेना (एकनाथ शिंदे गट)च्या उमेदवार नुरजहॉ निसार नायकवडी आणि अपक्ष उमेदवार मोहबतबी अब्दुलरशीद शेख यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सेहरनिदा नवाज मुश्रीफ या बिनविरोध निवडून आल्या.सेहरनिदा मुश्रीफ या मंत्री हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधु, माजी नगरसेवक अन्वर मुश्रीफ यांच्या स्नुषा असून त्यांच्या बिनविरोध विजयानंतर मुश्रीफ समर्थकांनी गैबी चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. विजयाच्या घोषणा देत समर्थकांनी आनंद व्यक्त केला.दरम्यान, या निवडणुकीत मुश्रीफ–घाटगे युतीला विरोध म्हणून शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक जोरदार पावले उचलत असून आगामी दिवसांत कागलचे राजकारण अधिकच तापणार असल्याचे चित्र आहे.



