
कोल्हापूर / प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाचे संचालक व प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी डॉ.चेतन अरुण नरके यांची भारतातील डेअरी उद्योगाची अग्रगण्य शिखर संस्था असणाऱ्या इंडियन डेअरी असोसिएशन(आय.डी.ए) नवी दिल्लीच्या संचालक पदी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्रातून निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांचे हस्ते व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थिती मध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला.
डॉ. चेतन नरके हे प्रगतशील दूध उत्पादक शेतकरी असून एक युवा, कार्यक्षम व नवनवीन उपक्रम राबवणारे संचालक म्हणून त्यांची ओळख आहे. एक शेतकरी दूध उत्पादक या स्तरावरून देशातील सर्वोच्च डेअरी उद्योगाची संस्था असणाऱ्या इंडियन डेअरी असोसिएशन(आय.डी.ए) संस्थेच्या संचालकपदी पोहोचणे हे गोकुळ संघासाठी अभिमानास्पद आहे.यापूर्वी गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी आय.डी.ए चे चेअरमन म्हणून उल्लेखनीय कार्यभार सांभाळला होता. त्यांचे चिरंजीव डॉ. चेतन नरके यांनीही तीच परंपरा पुढे चालवत, गोकुळतर्फे राज्यातील व जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी पुन्हा मिळवली आहे.
यावेळी बोलताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले की, “देशातील डेअरी उद्योगात अग्रस्थानी असणाऱ्या आय.डी.ए च्या संचालकपदी डॉ. चेतन नरके यांची निवड होणे ही गोकुळसाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी दूध उत्पादकांसाठी अभिमानाची बाब आहे.” त्यांनी डॉ. नरके यांना भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सत्कारास उत्तर देताना डॉ.चेतन नरके म्हणाले की,“गोकुळ दूध संघाच्या आणि आय.डी.ए च्या माध्यमातून राज्य व जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी, तसेच दुग्धव्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करत राहणार आहे.” त्यांनी गोकुळ संचालक मंडळाचे सत्काराबद्दल आभार मानले.
याप्रसंगी संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ, माजी अध्यक्ष व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले,अभिजित तायशेटे,अजित नरके,किसन चौगले, रणजीतसिंह पाटील,कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील, प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,शैमिका महाडिक, युवराज पाटील,राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.




