December 22, 2024

बानगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथील सभांना उस्फूर्त प्रतिसाद

(सोनाळी /प्रतिनिधी )

विरोधकांनी आता तरी अजिंक्यतारा वरून येणारी स्क्रिप्ट तरी बदलावी. रोज तेच तेच मुद्दे वाचून दाखवून त्यांनाही कंटाळा आला असावा. असा टोला महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी लगावला. कागल तालुक्यातील बाणगेसह म्हाकवे, मळगे बुद्रुक, बिद्री येथे आयोजित जाहीर प्रचार सभांमध्ये प्रा. मंडलिक बोलत होते. बानगे येथे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक संपत पाटील होते.
खासदार मंडलिक म्हणाले, घटना बदलण्याबाबत विरोधक कांगावा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. मात्र; चंद्र- सूर्य असेपर्यत ही घटना कायम राहील. लोकसभेसाठी महायुतीकडून मिळालेली उमेदवारी हा कागलचा गौरवच आहे. त्यामुळे कागलचा सुपुत्र म्हणून मला मताधिक्य द्या, असे आवाहनही संजय मंडलिक यांनी केले.
खासदार मंडलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहा वर्षात भारत देशाला विकसनशील देशाकडून विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विरोधी उमेदवारांपेक्षा त्यांचे प्रवक्तेच जास्त बोलायला लागलेत. आम्हाला जातीयवादी म्हणून हे हिणवणाऱ्या या प्रवक्त्यांचे पुरोगामीत्व सोयीनुसार आहे. मागील निवडणुकांमधील भूमिकांबाबत त्या प्रवक्त्यांनी उत्तरे द्यावीत.’

वेदगंगा काठचे खोरे कै. सदाशिव मंडलिक यांच्यामुळे सिंचनाखाली : मंत्री हसन मुश्रीफ

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, लोकनेते कै. सदाशिवराव मंडलिक यांनी कागलच्या जनतेच्या हितासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्याबाबत आपण कृतज्ञता म्हणून आणि त्यांचा पांग फेडण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देवूया. कागल तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिक्य हाच प्रा. संजय मंडलिक यांचा विजय ठरेल. त्यामुळे एक -एक मतासाठी संघर्ष करा. लोकनेते खासदार स्वर्गीय कै. सदाशिवराव मंडलिक यांनी वेदगंगा काठाचे खोरे काळम्मावाडी धरणाच्या सिंचन आराखड्यामध्ये नसतानाही या भागाला पाणी दिले. त्यामुळे साडेसहा हजार हेक्टर होऊन अधिक जमीन ओलिताखाली आली.

…मग अर्ज दाखल करण्यासाठी एकही नेता का नाही?
माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहिले. मात्र; गादीचा सन्मान राखण्यासाठी शाहू महाराज छत्रपती यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचा एकही नेता उपस्थित राहिलेला नाही. तर माझ्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यासह अनेक जेष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे मी भाग्यवान असल्याचेही मंडलिक यांनी सांगितले.

यावेळी शेखर सावंत, सुभाष चौगुले, राजू पाटील, धनाजी पाटील यांचीही मनोगते झाली. संतराम पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविक भगवान पाटील यांनी केले. अमोल सावंत यांनी आभार मानले.
……………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *