अधिवेशनातील सर्वच प्रश्नांना सरकार खंबीरपणे उत्तर देईल; वस्तुस्थिती लपवण्याची काहीही आवश्यकता नाही

( विशेष वृत्तसेवा / समाधान म्हातुगडे )
राज्यातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेल्यावर्षभरात प्रचंड विकास तर केलेलाच आहे. तसेच जनतेला दिलासा देण्यात सरकार यशस्वी ठरलेले आहे, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

अतिवृष्टी, दुष्काळ आणि महापूर यामुळे संकटग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला शासनाकडून ४० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यापैकी ५० टक्क्याहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर आर्थिक मदत पोहोचलेली आहे. लाडकी बहीण योजना सुरळीत करण्यात सरकारला यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या योजनेवर ४३ हजार कोटी खर्च केले आहेत. इतका मोठा आर्थिक ताण सोसूनही सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन, कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यात एक दिवसही वेळ केलेला नाही, पुणे, नागपूर, संभाजीनगर या शहरांमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचेही वचन पूर्ण करू. असेही ते म्हणाले. मंत्री श्री. मुश्रीफ कोल्हापुरात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, मुंबईसह एमएमआरडी आणि सबंध महाराष्ट्रभर मूलभूत विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. मुंबईत कोस्टल रोड, अटल सेतूचे उद्घाटन झाले आहे. तसेच; वाढवण बंदराचा शुभारंभही झालेला आहे.

नगरपरिषदांच्या लांबलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता श्री. मुश्रीफ म्हणाले, ईव्हीएम मशीनची सुरक्षा सांभाळणे आणि ईव्हीएम बाबतच्या शंका- कुशंका थांबायच्या असतील तर ताबडतोब निकाल होणे अपेक्षित होते. आज- उद्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत हा मुद्दा निकाली व्हावा, अशी अपेक्षा आहे. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी शितल तेजवानी यांना अटक केली आहे. त्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

समितीचा अभ्यास………!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी तर करणार आहोतच दरम्यान; राज्याचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीवरील अभ्यासासाठी अभ्यास समिती नेमली आहे. ही कर्जमाफी सातत्याने का करावी लागते, या कर्जाच्या जाचातून शेतकऱ्याची कशी सुटका होईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, याचा सविस्तर अहवाल ही समिती देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *