
वाघापूर/प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील वाघापूर येथील स्वागत कमानीच्या नावावरून गावात संघर्ष वाढला आहे. स्वागत कमानीस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी दलित समाजाने वाघापूर ते हिवाळी अधिवेशन पर्यंत पायी लाँग मार्चची सुरुवात केली आहे.
वाघापूर येथील दलित समाजाने याबाबत जिल्हाधिकारी व प्रशासनाला निवेदन दिले असून निवेदनात म्हंटले आहे की संबंधीत जागेस प्रवेशद्वार करून त्या प्रवेशद्वारास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव वाघापूर ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २००४, २६ जानेवारी २०१३, २६ जानेवारी २०१५ गावसभा व २४ फेब्रुवारी २०२५ च्या मासिक सभेत केला आहे. असे असतानाही ग्रामपंचायतीने अद्याप या स्वागत कमानीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यास विरोध केला आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय ५ मे २००४ च्या परिपत्रकानुसार कोणत्याही महापुरूषाचे नाव देता येत नाही, असे नमुद केले आहे. मात्र २६ जानेवारी २००४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान उभी करण्याचा ठराव सर्वानुमते पास झालेला आहे. तरी सर्व समाजाच्या भावना लक्षात घेवून ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी करावी. यासाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागितली असता आमच्या मागणीला कोणत्याही प्रकारची दाद देण्यात आली नाही. त्यामुळे या स्वागत कमानीस त्वरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी हिवाळी अधिवेशनावर लाँगमार्च काढला आहे. या मोर्चात दलित समाजातील सर्व कुटूंबिय मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या निवेदनावर अनेक दलित समाजातील नागरिकांच्या सह्या आहेत.
जातीय तेढ निर्माण होवू नये, सामाजिक सलोखा रहावा यासाठी प्रशासनाने स्थानिक पातळीवरती चर्चा करून प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातून होत आहे. निवेदनवरती बबन कांबळे, भगवान कांबळे, रघुनाथ कांबळे ,आत्माराम कांबळे, साताप्पा कांबळे, तानाजी कांबळे, यल्लाप्पा कांबळे , नेताजी कांबळे, अशोक कांबळे यांच्या सह्या आहेत. तर लॉंग मार्च सुरुवातीस दलित समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



