( बिद्री/ प्रतिनिधी )

कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्यातून होणाऱ्या प्रदूषणमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यावरती त्वरित उपाययोजना करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक होत कार्यकारी संचालक एस.एन. घोरपडे यांना या प्रदूषणाचे पुरावे दिले. युवा नेते बालाजी फराकटे व माजी पंचायत समिती सदस्य नंदू पाटील यासह शिष्टमंडळाने कार्यकारी संचालक घोरपडे यांना उपाय योजनेबाबत निवेदन दिले.

कागल , राधानगरी, भुदरगड व करवीर या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या बिद्री सहकारी साखर कारखाना ऊसदराबाबतीत ‘लय भारी’ आहे. मात्र प्रदूषणाची समस्या परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्षे सतत भेडसावत आहे तो प्रश्न सोडवण्यात मात्र प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

यावेळी बालाजी फराकटे म्हणाले, बिद्री साखर कारखान्याला याबाबत आम्ही वारंवार निवेदने दिली आहेत. पण याबाबत प्रशासनाने कोणतीही उपाय योजना केलेली नाही. कार्बन राख जेवण, पाणी याच्यामध्ये पडत असून लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. आठ दिवसात यावर उपाययोजना झाली नाही तर कारखाना गेटला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला.

जिल्हा प्रदूषण महामंडळ व कारखाना प्रशासन यांना देण्यात आलेल्या निवेदननात म्हणले आहे की, बिद्री सहकारी साखर कारखान्यामधून निघणाऱ्या कार्बन व धुरामुळे बोरवडे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असून लहान मुले, वृद्ध नागरिक व महिलांमध्ये श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचारोग, खोकला व इतर आजार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. कारखान्याच्या चिमण्यांमधून निघणारा धूर, कार्बनचे कण व राख थेट गावामध्ये पसरत असून शेती, पाणी स्त्रोत व जनावरांवरही याचा विपरीत परिणाम होत आहे.

याबाबत अनेक वेळा तोंडी तक्रारी करूनही आजपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे .त्यामुळे कारखान्यातून निघणाऱ्या धूर व कार्बन उत्सर्जनावर तातडीने नियंत्रण ठेवावे, आधुनिक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (फिल्टर/स्क्रबर) त्वरित कार्यान्वित करावी, प्रदूषण मापन करून त्याचा अहवाल ग्रामस्थांना जाहीर करावा, प्रदूषणामुळे बाधित नागरिकांची आरोग्य तपासणी व उपचाराची व्यवस्था करावी, भविष्यात असे प्रदूषण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.या मागण्यांची आठ दिवसात दखल घेऊन योग्य कार्यवाही न केल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने मोर्चा, आंदोलन व कायदेशीर लढा उभारावा लागेल, आणि आठ दिवसात कारखाना गेटला जनतेकडून टाळे ठोकण्यात येईल असा इशारा बालाजी फराकटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिला आहे.

यावेळी दिगंबर पाटील, संदेश चौगले यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी राजेंद्र चौगले,दिगंबर पाटील, पांडुरंग जांभळे,संग्राम वारके,विशाल मगदूम,कृष्णात केसरकर, संदेश पाटील, अमर बलुगडे, भास्कर कांबळे, पांडुरंग फराकटे, विकास साठे, राजू साठे, भास्कर कांबळे यांच्यासह बोरवडे व बिद्री ग्रामस्थ उपस्थित होते.

के पी साहेब आता आम्हाला ग्रामोझोन द्या…

अनेक वर्षापासून बिद्री साखर कारखान्याच्या होणाऱ्या प्रदुषणमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवून कुटुंबे उद्वस्त होत आहे. यावेळी बिद्रीचे नंदकुमार पाटील म्हणाले, अनेक वेळा निवेदन देवून देखील प्रशासन दखल घेत नाही. आता आम्ही गावात राहायचे की नाही ? नाहीतर के पी साहेब आम्हाला ग्रामोझोन औषध तरी द्या , नाहीतर कारखान्याच्या दारात आम्ही आत्मदहन करतो. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

———————————————

कारखाना प्रशासन नागरीकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये प्रयत्न करत असून लवकरच यावरती उपययोजना केल्या जातील.

एस. एन. घोरपडे कार्यकारी संचालक ,बिद्री साखर कारखाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *