(कोल्हापूर /प्रतिनिधी )
आजवर मुंबई ,बेंगलोर ,कोल्हापूरसह कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता विकल्या गेल्या आहेत, गादीचे वारसदार असल्याचे सांगणाऱ्यांनी अगदी दत्तक विधान झालेल्या वाड्याची मालमत्ताही विकून खाल्ल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मुरगूड येथे बोलत होते.
राजे राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपणच राजर्षि शाहूंच्या रक्तामासाचे वारसदार आहोत ,पण संपत्तीच्या वारसदारांनी संस्थानातील अनेक कोटीच्या मालमत्ता विकल्याचा गंभीर आरोप केला होता , त्याचा संदर्भ देत जमादार म्हणाले, “कोल्हापूर संस्थांनचे वारसदार कोण हा काही विषय नाही ? प्रिन्सेस पद्माराजे यांचे पुत्र राजे राजवर्धन कदमबांडे हेच या गादीचे खरे वारस आहेत. विद्यमान शाहू महाराज छत्रपती हे फक्त आता संपत्तीचे वारसदार राहिले आहेत. गेल्या २५ -३० वर्षात कोल्हापूर संस्थांनाशी निगडित अनेक मालमत्ता विकण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे.” १९६२ साली कोल्हापुरात आताच्या शाहू महाराजांना दत्तक घ्यायला प्रचंड विरोध झाला. मोठे जनआंदोलन उभारले गेले. त्यात लाखों लोक सहभागी झाले. त्यामुळे कोल्हापूर संस्थानात दत्तक विधान विधीचा कार्यक्रम घेण्यास जागाच राहिली नाही.अखेर लाखो जनतेचा विरोध झुगारून बेंगलोर येथील कोल्हापूर पॅलेस या वाड्यात दत्तक विधान विधी झाला. बेंगलोर येथील ज्या वाडयाने आत्ताचे शाहू महाराज संपत्तीचे वारसदार झाले त्यांनी या वाड्याचाही बाजार करून तो विकून खाल्ला, याकडे लक्ष वेधून जमादार म्हणाले,” राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी मुंबईतील मुक्कामासाठी पन्हाळा लॉज बांधले. केली होती. राजर्षि शाहू महाराज आजारी पडल्यावर त्यांचे काही काळ या लॉजमध्ये वास्तव्य होते. राजर्षिच्या वास्तव्याने पवित्र असलेली ही वास्तूही गादीचा वारसा सांगणाऱ्यांच्या कचाट्यातून सुटली नाही. तिचाही त्यांनी बाजार केला.कोल्हापूर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कात्यायनी परिसरात ४० एकर परिसरात पिवळा बंगला या नावाने एक वास्तू राजर्षि शाहू महाराजांनी बांधली होती. शिकारीसाठी कात्यायनी पार्क हे संरक्षित जंगल होते. शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांनाही शिकारीची आवड होती. त्या घोड्यावरून भाल्याने डुकरांची शिकार करत असत. कुटुंबासह शिकारीला गेल्यावर महाराज या वाड्यावरच मुक्कामाला असत. तो वाडा ही या वारसदारांनी विकून टाकला. आज या ४० एकराच्या जागेतून महाराजांचे अस्तित्वच पुसून टाकण्यात आले आहे.आताच्या विद्यमान शाहू महाराजांच्या एका वारसदाराने कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडीयम जवळची आरक्षित असलेली जवळजवळ साडेतीन एकर जागा विकून टाकली आहे. एकूणच ही काही उदाहरणे पाहिली तर संपत्तीच्या वारसदारांनी आतापर्यंत कोट्यावधी नव्हे तर अब्जावधी रुपयांच्या मालमत्ता विकल्याचे समजते. असे सांगून राजेखान जमादार म्हणाले , “यातील अनेक वास्तू केवळ दगड मातीच्या इमारती नाहीत. राजर्षी शाहू महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ऐतिहासिक वास्तू आहेत. इतिहासाच्या साक्षीदार आहेत. पण संपत्तीचा वारसदार असलेल्यांनी केवळ त्याकडे प्रॉपर्टी म्हणून पाहिले. त्यातून माया गोळा केली.अधिक शोध घेतल्यास संपत्तीची विल्हेवाट कशी लावली त्याची आणखीही काही उदाहरणे पुढे येतील. कोट्यावधी रुपयांच्या मालमत्ता विक्री करण्याचा सपाटा संपत्तीच्या वारसदारांनी लावल्याचा राजर्षि शाहू महाराजांचे पणतु , छत्रपती राजाराम महाराजांचे नातू व प्रिन्सेस पद्माराजे यांचे सुपुत्र राजवर्धन कदमबांडे यांनी केलेले आरोप बिल्कूल निराधार नाहीत, असेच आढळून येईल. “