मताधिकार बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय मंडलिक म्हणाले, वातावरणात प्रचंड उष्णता असताना देखील मतदार आपल्या मताचा अधिकार बजावण्याची जबाबदारी अत्यंत चोखपणे व उत्साहात पार पाडत आहेत. त्यांच्यातील हा उत्साहच मताची टक्केवारी वाढवणारा ठरणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची पोचपावती मतदार आपल्या संमतीच्या मताने देणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने केलेल्या अनेक क्रांतिकारक निर्णयाचा देखील मतांमध्ये अनुकूल परिणाम दिसणार आहे.
( विशेष वृत्त : समाधान म्हातुगडे )
महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी चिमगाव ता. कागल येथे आपला मताचा अधिकार सकाळी ९.१५ वा. बजावला. मताधिकार बजावण्यासाठी त्यांच्यासमवेत त्यांचे कुटुंबीय सौ. वैशाली, चिरंजीव वीरेंद्र, सुनबाई सौ. संजना, मुलगा यशोवर्धन, समरजीत यांनी मतदान केंद्र क्र. २०० वर आपला मताचा हक्क बजावला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, समरजितसिंह घाटगे, राहुल देसाई, के. पी. पाटील इत्यादी या प्रचारप्रमुखांनी मतदारांपर्यंत केंद्र व राज्य सरकारची भूमिका अत्यंत तळमळीने मांडली आहे. याचे मतदानामध्ये नक्की रूपांतर होणार आहे याची मला खात्री आहे.
दरम्यान, सकाळी १० वा. खासदार संजय मंडलिक यांनी निढोरी व सोनाळीमध्येमध्ये बुथवर कार्यकर्त्यांची भेट घेऊन मतदानाची आकडेवारी घेतली. येथे सकाळी 11 वा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट घेऊन सुरेशराव सूर्यवंशी, केशवकाका पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, देवानंद पाटील, विठ्ठल पाटील, अमित पाटील आदी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.