
(कोल्हापूर /आदित्य सुतार)
विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा वापर विवेकाने करावा,जीवन सुखकारक होईल, असे मत कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त किरण कुमार धनवाडे यांनी व्यक्त केले.शहरस्तरीय वैज्ञानिक प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवास आज राजेंद्र नगर येथील बड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये आजपासून सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. पहिली ते पाचवी गटात ३९ सहावी ते आठवी गटात १०२ नववी ते बारावी गटात ५० दिव्यांग गटात ११ शिक्षक गटात १३ तर विज्ञान सहाय्यक परिचर गटात चार असे एकूण २४९ उपकरणे मांडण्यात आलेली आहेत. यावर्षी शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महानगरपालिकेचे उपायुक्त किरण कुमार धनवाडे व प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शन चे उद्घाटन झाले. यावेळी विज्ञान पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत कुंभार, विजय माळी, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील ,महासंघाचे राजेंद्र कोरे ,महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण समितीचे सुधाकर सावंत, संस्थापिका शोभा तावडे, प्राचार्या आशा आनंद ,रसूल पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.प्राथमिक शिक्षण समिती व माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान उद्घाटन पूर्वी परिसरातून ग्रंथ महोत्सव निमित्त ग्रंथ दिंडी काढण्यात आली. पारंपारिक वेशभूषेमध्ये व वाद्यांच्या गजरात निघालेल्या ग्रंथ दिंडीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनाधिकारी डीसी कुंभार यांच्या हस्ते दिंडीचे पूजन झाले.विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीची समस्या जाणून त्यावर आधारित उपकरणे बनवली आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी गर्दी केली होती.
प्रदर्शनमध्ये फायर सेफ्टी गॅस लीक अलार्म, स्मार्ट स्टिक व गॉगल, मिनी सेफ कार पार्किंग, हवेच्या दाबावर चालणारी क्रेन, अपंगासाठी ए आय कार, कचरा व्यवस्थापन व प्लॅस्टिक ला उपाय, आईची काळजी घेणारा कुकर ,जलसंवर्धन व जल व्यवस्थापन ,पर्यावरण स्नेही रोपवाटिका, बहुउद्देशीय शेती उपयोगी यंत्र ,फायर फायटिंग रोबोट ,नदीजोड प्रकल्प, भूकंप रोधक इमारत ,बर्ड फिडर प्रो ,भूकंप डिटेक्टर, रेल्वे अपघात नियोजन यासारखे अनेक प्रयोग प्रदर्शनात सादर करण्यात आले.
दरम्यान आज दुपारपासून परीक्षणाचे काम सुरू होते. उद्या सी.आर.सी. गटानुसार प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता विजयसिंह भोसले यांचे ‘हसत खेळत विज्ञान शिकूया’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी तीन वाजता प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांच्या अध्यक्षतेखाली , प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार व माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी हनुमंत बिराजदार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. तरी सर्व शाळांचे मुख्याध्यापक विज्ञान शिक्षक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासन अधिकारी डी.सी. कुंभार यांनी केले आहे.



