
बिद्री ता. २० ( प्रतिनिधी ):
बिद्री ( ता. कागल) येथे सोमवार दि. २२ व मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी ५३ वे कागल तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी एसटीइएम ‘ हा या प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे. स्वर्गीय अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉॅ. शिवराम भोजे बालविज्ञान नगरी केंद्रशाळा बिद्री येथे हे प्रदर्शन पार पडणार आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी दिली.
सोमवारी सकाळच्या सत्रात उपकरणांची नोंदणी व मांडणी करण्यात येणार आहे. तर त्यानंतर विज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. यावेळी माजी खास. प्रा. संजय मंडलिक, माजी आम. संजयबाबा घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे, केडीसीसीचे संचालक भैय्या माने, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, अंबरीश घाटगे, बिद्रीचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, भूषण पाटील, जयदीप पोवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, शिक्षणाधिकारी ( योजना ) अनुराधा म्हेत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तहसीलदार अमरदीप वाकडे, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, विस्तार अधिकारी रामचंद्र गावडे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवार २३ रोजी सकाळी अकरा वाजता प्रा. डॉ. एस. एन. कुलकर्णी यांचे ‘ उदयोन्मुख तंत्रज्ञान ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. सकाळ सत्रात उपकरण व साहित्यांचे परीक्षण होणार असून दुपारी चार वाजता समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे. या विज्ञान प्रदर्शनाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे यांनी केले आहे.



