(विषेश वृत/ समाधान म्हातुगडे )

मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सोबत होते. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

मंत्री हसन मुश्रीफ व समरजित घाटगे हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावशाली नेते आहेत. त्यांच्या एकत्रित भेटीमुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणांमध्ये बदल होणार
असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

समरजित घाटगे हे गेल्या काही काळापासून राजकीयदृष्ट्या सक्रिय असून वेगवेगळ्या पक्षांशी संवादात आहेत. ही भेट म्हणजे सत्ताधारी गटाशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न
किंवा भविष्यातील राजकीय वाटचालीचा संकेत असा अर्थ काढला जात आहे.

हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये असून सध्या सत्तेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात उपस्थितीत ही भेट झाल्याने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. शाहू ग्रुपचे समरजित घाटगे हे सद्या तरी राष्ट्रवादी (शरद पवार) गटात असल्याने महाविकास आघाडीला धक्काच असू शकतो. यामुळें स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुश्रीफ - घाटगे यांनी मुख्यमंत्र्यांशी घेतलेली  भेट सूचित करते की , सत्ताधारी गट भाजप–शिवसेना (शिंदे) – राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्ह्यात पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहेत. 

काही स्थानिक नेते भूमिका बदलण्याच्या विचारात असू शकतात ,यामुळे विद्यमान राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.

समरजितसिंह घाटगे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण नाते व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या सोबत राहून ‘नवी क्रेझ ‘ निर्माण करू शकतात. ते सत्ताधारी गटाच्या अधिक जवळ जात असल्याने भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या निर्णयाचा थेट परिणाम ग्रामीण मतदारसंघांवर होऊ शकतो .

हसन मुश्रीफ यांचे राजकीय वजन वाढणार

हसन मुश्रीफ हे कोल्हापूरचे अनुभवी नेते आहेत. त्यांनी कतृत्वाच्या बळावर विकासनिधी खेचून आणत जिल्हयात अनेक विकासकामे केली आहेत. त्यांच्या भूमिकामुळे जिल्ह्यातील विकास निधी, प्रशासकीय कामे वेग घेतील सत्ताधारी गटातील “कोल्हापूरचा चेहरा” म्हणून त्यांचे वजन वाढेल व विरोधकांवर दबाव निर्माण होईल.

काँग्रेस आणि शरद पवार गटास अडचण

या भेटीमुळे काँग्रेस आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असून काही नेते सत्ताधारी गटाकडे वळण्याची शक्यता आहे.

हि भेट म्हणजे सत्ताधाऱ्यांची जिल्ह्यात पकड मजबूत करण्याची रणनीती असून काही नेत्यांसाठी दिशा बदलणारा टप्पा आहे. कोल्हापूरच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटात असलेले माजी खासदार संजय मंडलिक व मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात संघर्ष वाढत आहे. सध्या भाजपात असलेले माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्याशी चर्चा करून आगामी निवडणुका मुश्रीफ व दोन्ही घाटगे एकत्र लढणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. याचा थेट परिणाम पंचायत समिती, जिल्हा परिषद , ग्रामपंचायती तसेच स्थानिक पातळीवरील निवडणुकांवर होईल.

समरजित घाटगे हे भाजप किंवा सत्ताधारी आघाडीत प्रवेश करू शकतात. जिल्हास्तरीय किंवा प्रादेशिक पातळीवर जबाबदारी मिळवणे,
आगामी निवडणुकांसाठी “फ्रंटलाइन लीडर” म्हणून तयार होण्याचे मनसुबे दिसून येतात. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची थेट भेट ही साधी औपचारिक नसून राजकीय संकेत देणारी मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *