(कागल / प्रतिनिधी )
निराधांची पेन्शन दरमहा २००० आणि लाडक्या बहिणींचे अनुदान दरमहा २१०० करूनच दाखवू, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते कागलमध्ये २६० निराधारांना पेन्शन मंजुरीपत्रांचे वाटप झाले. कार्यक्रमाच्या कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैया माने होते.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल तालुका संजय निराधार गांधी निराधार समिती आणि तहसीलदार अमरदीप वाकडे यांचे गोरगरिबांच्या सेवाभावातून सुरू असलेले हे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. सुरुवातीला मासिक साठ रुपये अनुदान होते. त्यानंतर १८० रुपये, दोनशे रुपये, सहाशे रुपये असे करीत ते दीड हजार करण्यात यश मिळाले. कोणत्याही परिस्थितीत लवकरच निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन दीड हजारावरून दोन हजार करण्यासाठी, उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपये करण्यासाठी व ज्येष्ठ नागरिकात्वाची वयाची अट ६५ वरून ६० करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच; लाडक्या बहिणींचे अनुदानही दरमहा दीड हजारावरून २१०० रुपये करू, असेही ते म्हणाले.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गोरगरिबांची सेवा हाच माझ्या जीवनाचा ध्यास आहे. त्या भावनेतूनच विशेष सहाय्य खाते माझ्याकडे येताच गोरगरिबांच्या योजनांमध्ये आमुलाग्र बदल केले. ६५ वर्षावरील वृद्ध आई-वडिलांना पेन्शन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असेही ते म्हणाले.
गोरगरिबांचे आशीर्वाद…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे काम तर उत्कृष्ट आहेच. तसेच; तहसीलदार अमरदीप वाकडे आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांनीही अत्यंत मनापासून काम केले आहे. गोरगरिबांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी सेवाव्रती भावनेने काम करणाऱ्या या सर्वांना गोरगरिबांचे आशीर्वाद मिळतील, असेही ते म्हणाले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, तहसीलदार अमरदीप वाकडे, माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत, माजी उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, शहराध्यक्ष संजय चितारी, तानाजी कुरणे, सम्राट सणगर, नामदेव मांगले, सुरेश बोभाटे, अमित पिष्टे, अर्जून नाईक, सागर गुरव, प्रवीण सोनुले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. दिग्विजय डुबल यांनी आभार मानले.



