
प्रभाग क्र. चार, सात, १६, १८ मध्ये जाहीर सभांना जोरदार प्रतिसाद
(कोल्हापूर / प्रतिनिधी)
महायुतीच्या नगरसेवकांची कार्यालये प्रभागाच्या विकासासह गोरगरिबांच्या कल्याणाची केंद्रे बनतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासह गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना राबवण्याच्या कामांमध्ये सर्वच नगरसेवकांच्या पाठीशी हिमालयासारखा राहू, असेही ते म्हणाले.
प्रभाग क्र. चार, सात, १६, १८ मध्ये आयोजित जाहीर प्रचारसभांना जोरदार प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात त्यांच्या समवेत भाजपच्या नेत्या सौ. चित्राताई वाघ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, भाजपाचे महेश जाधव या प्रमुखांसह प्रभागनिहाय उमेदवार व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, वास्तविक महानगरपालिकेसह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था ह्या रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारखे नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी असतात.
कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीकडे दिल्यास शहरात विकासाची गंगा येईल. महायुतीचे सर्वच नगरसेवक गोरगरिबांच्या, सामान्य नागरिकांच्या जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी कल्याणकारी योजना घराघरापर्यंत पोहोचवतील.
भाजपच्या नेत्या सौ. चित्राताई वाघ म्हणाल्या, गेल्या ५० वर्षात काँग्रेसने महिलांसाठी काहीच केले नाही. केंद्र सरकार आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने जन्मापासून मरणापर्यंत विविध कल्याणकारी योजना राबविल्या. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मानसन्मान आणि सक्षमताही दिली. परंतु; हे काँग्रेसवाले मात्र ही योजना बंद करा म्हणून कोर्टात गेले होते. आता ते कोणत्या तोंडाने या लाडक्या बहिणींची मते मागणार असा सवाल ही त्यांनी केला. ज्यांच्या ताब्यात २० वर्षे महानगरपालिका होती ते आज महिलांसाठी टॉयलेट बांधतो, दवाखाना बांधतो म्हणत आहेत. मग त्यांनी २० वर्षे काय केले?
निवडणुकीनंतरही त्यांनी केएमटीतूनच फिरावे…..!
श्री. मुश्रीफ म्हणाले, काँग्रेसचे नेते आज के. एम. टी. बस मधून फिरून स्टंटबाजी करीत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशी स्टंटबाजी त्यांनी करू नये. निवडणुका झाल्यानंतरसुद्धा त्यांनी केएमटी बसमधूनच फिरावे.
………….



