
( व्हनाळी/ प्रतिनिधी )
अन्नपूर्णा कारखान्याच्या उभारणीत मुश्रीफांनी मदत केली त्यावेळी संजयबाबांनी शब्द दिला होता की येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू तो शब्द आम्ही पाळला. त्यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी दोन जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समिती जागा देतो असा शब्द दिला होता त्यांनी देखील तो शब्द पाळावा असे आवाहन गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनी केले.
बस्तवडे फाटा (ता. कागल) येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद कापशी व चिखली मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सुयशा घाटगे, धनराज घाटगे , एकनाथ पाटील , ऍड. अमर पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना अंबरिषसिंह घाटगे पुढे म्हणाले, कागल तालुक्यात कोणत्याही एका गटाचा आधार असल्याशिवाय राजकीय लढाई करणे शक्य होत नाही याचा विचार करता कार्यकर्त्यांचच्या हिताचा असणाराच आपण निर्णय घेऊ. सन्मान जनक तोडगा निघावा यासाठीच प्रयत्न होतील परंतु आम्हाला कोणी हलक्यात घेतलं तर शेंडी तुटेल नाहीतर पारंबी तुटेल या न्यायाने आरपारच्या लढाईसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असेही ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्ताने संजयबाबांच्या पाठीमागे असणाऱ्या जनशक्तीचे ताकद सर्वांनीच पाहिलेली आहे. संजयबाबांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर कागल तालुक्यातून 84 हजार 989 इतकी उच्चांकी मते आपण शाहू महाराजांना मिळवून दिली आहेत.
मुश्रीफ यांच्या पाठीशी का राहिलो याचे कारण देताना अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, कागल तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांसह सर्वांना उध्वस्त करणार होता. शेतकऱ्यांचे कुटुंबे उध्दवस्त होवू नयेत म्हणून हा मार्ग कागल तालुक्यातून मार्ग रद्द करावा अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांचेकडे केली होती, त्यांनी मान्य केल्यामुळे त्यांना पाठीबा दिला.
ऐन उमेदीच्या काळातील 38 वर्षे संजयबाबांनी केवळ राजकारणासाठी योगदान देऊन घाटगे गट सांभाळला ,वाढवला. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कधी आम्ही कमी पडलो नाही. प्रसंगी सोने गहाण ठेवले अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्ते हे आमचे स्वास्थ्य आणि कवच कुंडले आहेत , त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडू शकत नाही. त्यामुळे ठरलेल्या जागा आहेत. त्या मुश्रीफ देतील अशी आशा आहे जागेच्या बाबत अदलाबदल करू पण जागेबाबत तडजोड होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
धनराज घाटगे म्हणाले,” कागल नगरपालिकेत भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाची पुनरावृत्ती जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत होऊ नये. आता कोणावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचे अपक्ष फॉर्म भरून तयारी ठेवावी लागेल. कोणालाही भीक न घालता ठरल्याप्रमाणे आम्हाला जागा न मिळाल्यास संघर्ष अटळ आहे. कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्ते थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत.”
त्यांना विसरायचं नाही…
कोणीही उमेदवार जिंकण्यासाठी खेळी करत राहणार परंतु त्या खेळीला कोण बळी पडले आहे.पडद्यामागून कारवाया करत कोणी पाठीत खंजीर खुपसला हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे अशा अपप्रवृत्तीला विसरायचं नाही अशी जाणीव ही घाटगे यांनी करून दिली.
कार्यक्रमास एम.बी .पाटील ,दत्तोपंत वालावलकर , एकनाथ नार्वेकर , महेश देशपांडे , ए.वाय.पाटील, बिद्री कारखाना संचालक रणजीत मुडुकशिवाले, मंडल अध्यक्ष एकनाथ पाटील , ऍड.अमर पाटील, काकासो सावडकर, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत महावीर पाटील यांनी केले
प्रास्ताविक एकनाथ नार्वेकर यांनी तर आभार तानाजी कुरणे यांनी मानले.
फोटो ओळी: बस्तवडे फाटा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अंबरिषसिंह घाटगे, व्यासपीठावर उपस्थित सुयशा घाटगे व इतर मान्यवर , समोर उपस्थित कार्यकर्ते.
(छायाचित्र -सागर लोहार,साके)



