सडोली / प्रतिनिधी


स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार संपतरावबापू पवार- पाटील यांनी सहकार्याची भूमिका घेतली होती. भोगावती साखर कारखाना निवडणुकीमध्येही त्यांची दिलजमाई झाली होती. संघर्ष मिटून एकोपा वाढावा, अशीच विधायक भूमिका स्वर्गीय पी. एन. पाटीलसाहेब यांची होती. या निवडणुकीच्या माध्यमातून क्रांती पवार- पाटील यांचा प्रचंड मताधिक्यांनी विजय होऊन स्वर्गीय पी. एन. पाटीलसाहेब यांचे स्वप्न साकार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर यांनी केले. या दोन्हीही नेत्यांचा विचार आणि कामे घेऊनच आम्ही सर्वजण एकदिलाने पुढे जात आहोत, असेही ते म्हणाले.

सडोली ता. करवीर येथे सडोली जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार क्रांतीसिंह पाटील, सडोली पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार निवास पाटील व हसुर पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार विलास भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत श्री. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. मारूती चव्हाण होते.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राहुल पाटील- सडोलीकर हे राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि संपतरावबापू पवार- पाटील हे शेतकरी कामगार पक्ष म्हणून एकत्र आलेले आहेत. त्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे सडोली खालसा मतदार संघातील उमेदवार विक्रमी मताधिक्याने विजयी होतील.

माजी आमदार संपतरावबापू पवार- पाटील म्हणाले, आज आम्ही सर्वजण एकत्र आहोत ही स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब यांनी घेतलेल्या विचारांची नांदी आहे. कारण, विकासासाठी त्यांचा विचार आणि आमचा विचार वेगवेगळा असेल. परंतु; तत्त्वज्ञानावर आधारित पुरोगामीत्वाचा त्यांचा आणि आमचा विचार एकच आहे. त्यांनी दिलेला भविष्याचा वेध टिकवूया आणि वाढवूया. आपापसातील कुटुंबवात्सल्य टिकवूया आणि गोरगरिबांच्या कल्याणाची भूमिका घेऊन पुढे जाऊया, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर म्हणाले, ज्याप्रमाणे याआधी स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब आणि माजी आमदार संपतरावबापू पवार- पाटीलसाहेब एकदिलाने विधानसभा निवडणूक, भोगावती साखर कारखाना आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकांना सामोरे गेले. त्याचप्रमाणे या निवडणुकीतही आम्ही एकदिलाने लढत आहोत. कै. पी. एन. पाटीलसाहेब आणि माजी आमदार संपतराव बापू पवार पाटीलसाहेब या दोघांनीही जनतेची कामे केलेली आहेत. या भागाचा विकास केलेला आहे.

सडोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार क्रांतिसिंह पवार- पाटील म्हणाले, संघर्षामुळे काहीही चांगले होणार नाही. त्यामुळेच जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील -सडोलीकर, केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील आणि आम्ही सर्वजण एकत्र आलो. भागाच्या विकासासाठी ही वज्रमुठ अशीच घट्ट ठेवूया. स्वर्गीय आमदार कै. पी. एन. पाटीलसाहेब यांच्यानंतर राहुल पाटील आमदार होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. राहुल पाटील आणि राजेश पाटील या बंधूंच्या मार्गदर्शनाखाली एकदिलाने काम करू.

कि-यानिष्ठांचे ऐकूच नका…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटीलसाहेब आणि माजी आमदार संपतरावबापू पवार- पाटील यांनी संघर्ष संपवून एकोपा निर्माण केला. मी आणि संजयबाबा घाटगे, मी आणि समरजीतसिंह घाटगे पराकोटीचा टोकाचा संघर्ष करूनही विधायक गोष्टींसाठी एकत्र आलो आहोत. तुम्हीही त्याच विचाराने एकत्र आला आहात. संपूर्ण आयुष्यभर एकत्र रहा. हे घडत असताना मागचं काहीतरी काढायचं, असं करू नका. तसेच; काहीजणांना चांगलं बघवतही नाही. अशा कि-यानिष्ठांचे ऐकूच नका.

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, रवी पाटील -बापू, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पाटील, केरबा भाऊ पाटील, दत्तात्रय मुळीक, अनिल पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

सडोली ता. करवीर येथे सडोली जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संपतरावबापू पवार- पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील- सडोलीकर व उपस्थित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *