बाचणी / प्रतिनिधी


दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांची शेवटची इच्छा नाकारणाऱ्यांना जनताच पराभूत करेल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार श्रीमती शोभा गणपतराव फराकटे यांच्यासह बोरवडे पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संभाजी फराकटे, सावर्डे बुद्रुक पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार डॉ. इंद्रजीत पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केली.

बाचणी ता. कागल येथे बोरवडे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री श्री. मुश्रीफ जाहीर सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. जयश्री पाटील होत्या.

मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कोणाला एकटे पाडण्यासाठी आपली युती झालेली नसून तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. कागल तालुक्यात चारही गटांना एकत्र करून निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आपली मनापासून इच्छा होती. परंतु विरोधकांना निवडणूक लढवण्याची भारी हौस होती. त्यामुळे ते आमच्या सोबत आले नाहीत. या निवडणुकीत युतीचे सर्वच्या सर्व अठरा उमेदवार निवडून येणार असून बाचणी गावातून तालुक्यात सर्वाधिक लीड मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, तालुक्यातील सर्व उमेदवार हे कोणत्याही एका पक्षांचे नसून ते युतीचे आहेत. तीनही गटांचे कार्यकर्ते एकजुटीने कार्यरत आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. स्व.गणपतराव फराकटे यांचे बोरवडे परिसराच्या विकासात मोठे योगदान आहे. शोभाताई फराकटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करुन त्यांच्या रुणातुन उतराई होण्याची संधी मतदारांनी साधावी. निकालानंतर विजयाचा गुलाल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना भेटण्यासाठी जाताना आम्हा तिन्ही नेत्यांची मान ताठ राहील इतक्या प्रचंड प्रचंड मताधिक्याने युतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा.

गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, युतीचे सर्व उमेदवार तीन हजारपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार आहेत. त्यामुळे विरोधकांना मत देऊन मतदारांनी आपले मत वाया घालवू नये. विरोधकांना मतदान म्हणजे नोटाला मतदान केल्यासारखे होईल. त्यामुळे जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकावे.

यावेळी बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील, विजय काळे, श्रीशैल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास ‘बिद्री’चे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, संजय पाटील, वसंत पाटील, दिनकर कोतेकर, माजी उपसभापती अंजना सुतार, शाहूचे संचालक भाऊसो कांबळे, प्रताप पाटील, नारायण पाटील, सुभाष भोसले, अमर भोसले, प्रताप पाटील, सागर सावर्डेकर, विकास पाटील, मारुती पाटील, सौरभ पाटील, दिलीप पाटील, सर्जेराव पाटील, इक्बाल नायकवडी आदी प्रमुख उपस्थित होते.

स्वागत प्रकाश पाटील यांनी केले. प्रास्ताविक उत्तम पाटील यांनी केले. आभार सुजित खामकर यांनी मानले.

मंत्री मुश्रीफ हे तालुक्याचे तंटामुक्त अध्यक्ष …
गावागावातील तंटे मिटून गावात एकोपा नांदावा यासाठी सरकारने गाव पातळीवर तंटामुक्त समितीची स्थापना केली. त्याचप्रमाणे मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यात तीन गटांना एकत्रित आणले आणि संपूर्ण तालुका तंटामुक्त केला. या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून मंत्री मुश्रीफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान झाला असता, असे मत गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी व्यक्त केले.


शोभाताई फराकटे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी होतील….
राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, कागल तालुक्याच्या पश्चिम भागात स्व. गणपतराव फराकटे यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला. त्यामुळे ते कामातून अजरामर झालेले लोकनेते आहेत. त्यांच्या घराण्याला समाजकारण आणि राजकारणाचा वारसा लाभला असून त्यांच्या पत्नी व बोरवडे जि. प. च्या युतीच्या उमेदवार शोभाताई फराकटे या जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील.
………….

बाचणी ता. कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे व जनसमुदाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *