बोरवडे / प्रतिनिधी

बोरवडेचे सुपुत्र दिवंगत गणपतराव फराकटे यांनी बिद्री- बोरवडे परिसरातील जनतेला आपले कुटूंब मानून त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या उन्नतीसाठी ते आयुष्यभर झिजत राहिले. त्यांच्या पश्चात कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करुन श्रीमती शोभाकाकी गणपतराव फराकटे यांना जिल्हा परिषदेवर निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत. शोभाकाकींचा विजय हीच स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय गणपतराव फराकटे यांना खरी श्रध्दांजली ठरेल, अशी भावनिक साद वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी घातली.
बोरवडे ता. कागल येथे बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार शोभाताई गणपतराव फराकटे, बोरवडे पंचायत समितीचे उमेदवार संभाजी साताप्पा फराकटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विजयमाला मगदूम होत्या.
शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, कागलात विधायक कामांसाठी आम्ही तिघेही महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आलो आहोत. भविष्यातही आम्ही तिघे एकत्रच राहणार आहोत. महापालिका, नगरपालिकांच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही महायुतीच जिंकेल.
गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, संघर्षामुळे काहीही चांगले होणार नाही. त्यामुळेच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. कार्यकर्त्यांनी मनातील किंतू- परंतू काढून टाकत भविष्यातही एकत्रित येऊन काम करण्याची तयारी ठेवावी. मागील काही काढू नका. काहीजणांना चांगल बघवत नाही, त्यांच्यापासून सावध राहा.
बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे म्हणाले, आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक आणि वैयक्तिक लाभाच्या योजना घरोघरी पोहोचवल्या आहेत. युतीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. युतीचे उमेदवार मताधिक्याने निवडून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.
यावेळी देवानंद पाटील, सत्यजित पाटील-सोनाळीकर, डॉ. महादेव साठे, विजय काळे, रणजीत कांबळे, बाळासाहेब फराकटे, भूषण लाड, नेताजी कांबळे, युवराज गायकवाड, राजश्री साठे, दिव्यांजली परीट यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ, संचालक अमरीश घाटगे, सुनीलराज सुर्यवंशी, भूषण पाटील, दिनकर कोतेकर, केशव पाटील, डी. एम. चौगले, प्रताप पाटील, आनंदा साठे, ज्ञानदेव फराकटे, जयदिप पोवार, रघुनाथ कुंभार, बाळासो वारके, आण्णासो पोवार, रावसो खिल्लारी, सरपंच जयश्री फराकटे, सुनील मगदूम, उपसरपंच दत्तात्रय पाटील आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक रघुनाथ कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन अशोक कांबळे यांनी केले. आभार यांनी ऊमेदवार संभाजी फराकटे मानले.
लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये देणार…..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यापाठीमागे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान आहे. ज्यांच्याकडे या विभागाचा मंत्रीपदाचा कार्यभार आहे त्या अदिती तटकरे या राष्ट्रवादीच्याच आहेत. ही योजना कधीही बंद होणार नसून लवकरच राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये दरमहा देणार असल्याची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. याला उपस्थित महिलांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
विजयाचा गुलाल घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार……
कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण तिघे एकत्र आलो असून नगरपालिका निवडणुकीत आपल्या युतीला जनतेने स्वीकारले आहे. आता जि. प. व पं. स. च्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी होणार आहेत. निकालानंतर विजयाचा गुलाल घेऊन आम्ही तिघेजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना भेटणार असल्याचे, राजे समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या मनोगत सांगितले.
……….



