
(आदमापूर/ प्रतिनिधी)
आदमापूर येथे श्री संत बाळूमामा भंडारा उत्सवाच्या निमित्ताने श्री सद्गुरू बाळूमामा गोसेवा समितीने देशी गोवंशाचे भव्य प्रदर्शन आणि गो महोत्सव मेळावा आयोजित केला आहे. या महोत्सवात जातीवंत गोवंशाची स्पर्धा आयोजित केल्या असून अनुभवी गोपालकांकडून गोवंशाची वंशावळ आणि आदर्श संगोपन याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अशी माहिती अरुण पाटील खेबवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जवार खीलार गट, संयुक्त एक वर्षाखालील कालवड गट, कोसा खिलार गट, जवार खिलार खोंड गट, संयुक्त एक वर्षाखालील खोंड गट, कोसा खिलार खोंड गटाच्या स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांक ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांक ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
याशिवाय सर्व गटातून “श्री सद्गुरू बाळूमामा केसरी चॅम्पियन गोमाता पुरस्कार” आणि “चॅम्पियन खोंड पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा १५ ते १६ मार्च दरम्यान बाळूमामा मंदिराच्या मागील बाजूस आयोजित करण्यात आली असून, प्रदर्शनासाठी येणाऱ्या गोवंशाची नोंदणी १५ मार्चपर्यंत करण्याचे आवाहन बाजीराव पाटील व भारत डेअरीचे संदीप उत्तूरे यांनी केले आहे.यावेळी तानाजी पाटील, अजित कांबळे गोरक्षक उपस्थित होते.




