मुरगुड / प्रतिनिधी
आमच्या घरातला कर्ता पुरुषच गेला, आता आम्हाला आधार कुणाचा? असे म्हणत काल शुक्रवारी वेदगंगा नदीत बुडून मृत्यू झालेल्या जितेंद्र लोकरे यांच्या पत्नी साधना व आई लक्ष्मी यांनी फोडलेल्या टाहोमुळे शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासह उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले.मयत जितेंद्र यांच्या पत्नी व मातोश्री पूर्णपणे खचून गेल्या आहेत. हे गर्भगळीत कुटुंबीय पाहून घाटगे यांनाही गलबलून आले.
श्री.घाटगे यांनी लोकरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांना आपण खंबीरपणे पाठीशी आहोत असा आधार दिला.कालच्या घटनेतून अजूनही लोकरे कुटुंबीय सावरलेले नाही.या कुटुंबीयांसह संपूर्ण मुरगूड शहरावर शोककळा पसरली आहे.
श्री घाटगे सांत्वनासाठी लोकरे यांच्या घरी जाताच त्यांचे बंधू मारुती यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मयत लोकरे यांची कन्या आरोही व मुलगा आर्यन यांनाही अश्रू आवरता आले नाहीत.भेदरलेल्या या चिमुकल्यांना घरातील मोठी मंडळी सावरण्याचा प्रयत्न करत होती. श्री घाटगे यांनीही त्यांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवून आधार दिला.
यावेळी दगडू शेणवी, अनिल अर्जुने, विजय राजीगरे, संतोष गुजर,राजेंद्र चव्हाण,जयवंत पाटील आदी उपस्थित होते.
मुरगुड येथे लोकरे कुटूंबियाच्या सांत्वनपर भेटीवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे
कोट
लोकरेंसह दुर्घटनेतील मयत झालेल्या सर्वच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांना नातेवाईकांसह समाजाने आधार देण्याची गरज आहे. शासकीय पातळीवर जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे-समरजितसिंह घाटगे