सावर्डे बुद्रुक: सोनाळी (ता. कागल) येथील नागनाथ पाणीपुरवठा संस्था अनेक वर्षे बंद अवस्थेत असल्याने थकित असलेले जिल्हा बँकेच्या 2 कोटी 90 लाख रुपयांची कर्जमाफी व्हावी यासाठीचे निवेदन सोनाळी ग्रामस्थांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाशराव आबिटकर यांना मुंबई येथे मंत्रालय मध्ये देवून चर्चा करण्यात आली .
सहकार मंत्री दिलिप वळसे पाटील यांना भेटून या संदर्भात चर्चा करू असे आश्वासन पालकमंत्री मुश्रीफ यांनी ग्रामस्थांना दिले.भूविकास बँकेची कर्जमाफी झालेनतर शेतकरी सभासद यातून मुक्त झालेत मात्र अद्याप जिल्हा बँकेचे कर्ज असल्याने संचालक मंडळ अडचणीत आले आहे. जिल्हा बँक व संस्थेचे संचालक मंडळ हा वाद कोर्टापर्यंत पोहोचला आहे. संचालक मंडळाच्या स्थावर मालमत्ता जप्त होण्याची शक्यता असून यातून मुक्त होण्यासाठी ग्रामस्थांनी मंत्रालयमध्ये धाव घेतली आहे. अनेक वर्षापासून न्यायासाठी प्रयत्न सुरू असून कर्जमाफी करून शेतकरी वाचवावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व आमदार यांच्याकडे केली आहे.
यावेळी डी.एम. चौगले, एन. एस. चौगले, पी. व्ही. पाटील, सोनाळी ग्रामपंचायतीचे सदस्य समाधान म्हातुगडे, रणजीत शेणवी, कृष्णात तेली उपस्थित होते.
तरच जिल्हयातील संस्थांना लाभ मिळणारं….
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत बैठक घेतली होती.त्यामध्ये बंद अवस्थेत असलेल्या संस्थांना शंभर टक्के कर्जमाफी व चालू संस्थांना 50 टक्के कर्जमाफी करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. माञ असे निकष लावले तर कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थांना याचा फारसा लाभ होणार नाही. व संस्थांची थकित कर्जाची परतफेड कोट्यवधी रुपयांची असल्याने निम्मे कर्जही फेडणे शक्य होणार नाही..त्यामुळे थकित असलेल्या शेतीच्या पाणी पुरवठा संस्थाचे जिल्हा व राष्ट्रीयकृत बँकाचे सरसकट कर्जमाफी व्हावी. याबाबत मंत्री हसन मुश्रीफ व आमदार प्रकाशराव आबिटकर यांच्याशी चर्चा आली असून लवकरच जिल्हयातील संस्थांना न्याय मिळेल.- समाधान म्हातुगडे भूविकास बँक कर्जमाफी कृती समिती अध्यक्ष.