(विजय पाटील/ सरवडे)

राधानगरी तालुक्यातील एक छोटंसं गाव कांबळवाडी. या गावातील खेळाडू नेमबाज स्वप्निल कुसाळे याने पँरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावून गावाला देशभर पोहचवले. १६ वर्षापूर्वी हे गाव ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात पहिले आल्याने राज्यभर या गावाचे कौतुक झाले होते. पहिले राज्यभर पोहचलेले गाव आता स्वप्निलच्या यशस्वी कामगिरीमुळे देशाच्या चर्चेत आले आहे.
स्वप्निलने देशाचे नाव उज्ज्वल केलेच त्यासोबत राज्य, जिल्हा, तालुका आणि गावालाही आता जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले आहे.
राधानगरी तालुक्यातील या गावची लोकसंख्या अवघी हजार बाराशे इतकी. गावात दूध, सेवा, शैक्षणिक संस्था आहेत. गावातील लोक एकोप्याने राहतात. राजकारण आहे पण मर्यादितच. गावाचा नावलौकिक व्हावा ही प्रत्येकाची इच्छा. या इच्छेतूनच २००७ साली महाराष्ट्र शासनाने राज्यात राबविलेल्या ग्राम स्वच्छता अभियानात या गावाने सहभाग घेतला. सर्वांच्या सहभागाने स्वच्छतेची काटेकोर अमंलबजावणी करण्यात आली.

प्रत्येकाचे घर -दार सुशोभित झाले. सुशोभिकरणाने गावचे रुप बदलले. पाहणाऱ्याला गावात पाय ठेवताच समाधान वाटायचे. स्वच्छता अभियान कमिटीने गावाचे परिक्षण केले आणि गावाने तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर यशाची भरारी मारली. तर राज्याच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. राज्यभरातून गावाचे कौतुक झाले. गाव पाहण्यासाठी जिल्हा, परजिल्ह्यातील लोक येवू लागले. तालुक्याच्या एका कोपऱ्यात वसलेल्या छोटेखानी गावाचे नाव स्वच्छता अभियानाच्या रुपाने राज्यभर पोहचले. स्वच्छता अभियानातील यशाला १५ वर्षे होऊन गेली. ते यश आता लोकांच्या विस्मरणात चालले असतानाच आज पुन्हा याच गावचा सुपुत्र स्वप्निल कुसाळे याने पँरिस येथे सुरु असलेल्या जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. त्याचे यश देशाला अभिमानास्पद ठरले. त्यामुळे देशभर आनंद व्यक्त झाला. विशेष म्हणजे महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये दुसरे कांस्यपदक पदक मिळवून देणारा स्वप्निल ठरला. कोल्हापूरच्याच पै.खाशाबा जाधव १९५६ च्या हेलसिंकी आँलम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये कांस्यपदक मिळविले होते.त्यानंतर स्वप्नीलच्या रुपाने दुसऱ्यांदा पदकांवर मोहर उमठविल्याने प्रसार माध्यमांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. त्याच्या कारकीर्दीचा आढावा घेताना प्रामुख्याने विचार झाला तो म्हणजे कांबळवाडी गावाचा. स्वप्निलने आपल्या यशातून केवळ स्वतःला जगभर पोहचवले नाही तर देश, राज्य, जिल्हा, तालुका व गावाचे नाव देखील चर्चेत आणले.



